ट्रॉय : तुर्कस्तानातील प्राचीन अवशेषांचे एक प्रसिद्ध स्थळ. सध्याचे हिसार्लिक. दार्दानेल्स सामुद्रधुनीच्या मुखापासून आग्नेयीस सु. साडेसहा किमी.वर ते वसले आहे. ट्रोजा, इलीऑन, ट्रोॲस, इलीअम वगैरे नावांनीही ते प्रसिद्ध होते. प्राचीन काळी ते ट्रोजन युद्धासाठी प्रसिद्ध पावले. होमरने इलिअडमध्ये तत्संबंधी लिहिले असून त्यातून स्फूर्ती घेऊन प्रथम हाइन्रिख श्लीमानने तिथे १८७१ मध्ये उत्खननास सुरुवात केली आणि १८८२ पर्यंत उत्खनन केले. उत्खननात ट्रॉयच्या मुख्य सात वसाहतींची माहिती हाती आली. येथे भिन्न काळात सु. नऊ शहरे वसली असावीत, असे उत्खननांद्वारे आढळले. त्यावरून ट्रॉयचा सांस्कृतिक इतिहास इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकापर्यंत मागे नेता आला. या सर्व कालखंडांतील ट्रॉयचे सांस्कृतिक जीवन वैशिष्ट्यपूर्ण होते. इ. स. पू. तिसऱ्या सहस्रकात म्हणजे नवाश्मयुगात ट्रॉयभोवती प्राकार असून त्यांत छोटा राजवाडा होता. दुसऱ्या कालखंडात ट्रॉयची अधिक भरभराट झाली. मोठमोठे प्रासाद, धातूची पात्रे, ब्राँझ, सोने आणि चांदी यांचे अलंकार व भांडी या कालखंडातील थरांत प्रामुख्याने सापडली. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या कालखंडांत ट्रॉयचे महत्त्व काहीसे कमी झालेले दिसते. कारण या कालखंडातील स्तरांत मोठमोठ्या प्रासादांऐवजी छोटी घरे बांधली गेली. इ. स. पू. सु. १९०० च्या नंतर म्हणजे सहाव्या कालखंडात पुन्हा अनेक प्रासाद बांधले गेले असावेत. या काळात मुख्य वस्तीभोवती दगडी प्राकार उभारण्यात आला. या वस्तीच्या अवशेषांत प्रथम घोड्याचे अवशेष मिळाले. आर्यसमूहातील भाषा बोलणारे लोक येथे वस्तीस आले असावेत, असे यानुसार दिसते. भूकंप आणि आगीमुळे या वस्तीचा इ. स. पू. सु १८०० मध्ये नाश झाला. ट्रोजन युद्ध व सुप्रसिद्ध हेलनची घटना इ. स. पू.१२०० ची असावी याबद्दल आता बहुतेक तज्ञांत एकमत झाले आहे. याही वस्तीचा नाश इ. स. पू. ११०० मध्ये झाला, त्यानंतरच्या काळात येथील वैभव नष्ट झाले. श्लीमाननंतर व्हिल्हेल्म डर्पफेल्ट याने असे दाखविले, की सहावा स्तर म्हणजेच होमरने उल्लेखिलेले ट्रॉय असावे. अलीकडे सिनसिनॅटी विद्यापीठाने ब्लेगेनच्या मार्गदर्शनाखाली तेथे विस्तृत प्रमाणावर उत्खनन हाती घेतले. तज्ञांच्या मते सातवा स्तर होमरचे ट्रॉय असावे. काहीही असले तरी ट्रोजन युद्धाचे स्थळ हेच होते, याविषयी आता फारसे दुमत नाही.

संदर्भ : 1. Angel, J. L. Troy, Princeton, 1951.

    2. Blegen, C. W. and Others, Ed. Troy, 4. Vols., Princeton, 1950–1958.

    3. Schliemann, Heinrich, Troy and Its Remains, 1875.

देव, शां. भा.