ट्रफॅल्गरची लढाई : इंग्लंडविरुद्ध फ्रान्स व स्पेन यांचे संयुक्त नौदल यांमध्ये २१ ऑक्टोबर १८०५ रोजी ट्रफॅल्गरच्या भूशिराजवळ झालेले युद्ध. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्सच्या महत्त्वाकांक्षेच्या आड मुख्यतः इंग्लंड येत आहे, हे ओळखून नेपोलियन बोनापार्टने इंग्लंडवर स्वारी करण्याकरिता स्पेनच्या मदतीने मोठे आरमार तयार केले. नेपोलियनची ही आरमाराची तयारी पूर्ण होऊ नये, म्हणून इंग्लंडने योग्य वेळी दखल घेऊन ⇨नेल्सनच्या नेतृत्वाखाली आरमार धाडले व पूर्वीचा १८०२ चा आम्येंचा तह धुडकावून देऊन फ्रान्सशी युद्ध पुकारले. इंग्लंडने शत्रूच्या बंदरांपाशी जहाजे ठेवल्यामुळे फ्रेंच आरमाराची नाकेबंदी झाली तरी फ्रेंच दर्यासारंग व्हिलनव्ह इंग्रजांना चकवून वेस्ट इंडीजपर्यंत गेला आणि नेल्सनच्या हाती न सापडता कादिझ बंदरात परत आला. लढण्याची संधी न मिळाल्यामुळे नेल्सन निराश झाला. त्याने व्हिक्टरी या जहाजाचे नेतृत्व आपणाकडे घेऊन रॉयल सॉव्हरिन या जहाजाचे नेतृत्व कथबर्ट कॉलिंगवुड याच्याकडे दिले. याशिवाय आणखी काही जहाजे त्यांच्या मदतीला होती. २१ ऑक्टोबर १८०५ रोजी नेल्सनने ट्रफॅल्गरजवळ त्यांच्याशी लढत दिली व त्यांचा संपूर्ण पराभव केला. लढताना नेल्सनला गोळी लागली व तो थोड्या अवधीने मरण पावला पण तत्पूर्वी त्यास यशाची वार्ता कळली होती. ‘परमेश्वरा धन्यवाद! माझे कर्तव्य मी पार पाडले’, हे त्याचे अखेरचे उद्गार होते. या विजयामुळे इंग्लंडचे आरमारी श्रेष्ठत्व प्रस्थापित झाले व इंग्लिश खाडी ओलांडून इंग्लंडवर आक्रमण करण्याच्या नेपेलियनच्या कल्पनेस कायमची तिलांजली मिळाली. परिणामतः त्याला व्यापारी नाकेबंदीची योजना अंमलात आणावी लागली. या युद्धात फ्रेंचांची एकूण २० जहाजे इंग्रजांच्या हातात पडली. त्यांपैकी एक नष्ट केलेले होते. इंग्लंडचे एकही जहाज निकामी झाले नाही. या युद्धात इंग्लंडने व मुख्यतः नेल्सनने आरमाराची व्यूहरचना अत्यंत विचारपूर्वक व वाखाणण्यासारखी केली होती. युद्धापूर्वी नेल्सनने प्रत्येक सैनिकास प्रत्येक व्यक्ती आपले कर्तव्य बजावील, असा इंग्लंडला विश्वास वाटतो असे सांगितले. ही त्याची वाणी पुढे चिरंतन झाली.
संदर्भ : Warner, Oliver, Nelson’s Battles, Toronto, 1965.
पोतनीस, चं. रा.