टोलर, एर्न्स्ट : (१ डिसेंबर १८९३–२२ मे १९३९). जर्मन नाटककार आणि कवी. शामॉचीन येथे एका ज्यू कुटुंबात जन्मला. हायड्लबर्ग, म्यूनिक आणि ग्रनॉबल येथील विद्यापीठांतून शिक्षण घेतले. पहिल्या महायुद्धात त्याने काही काळ जर्मन सैन्यात नोकरी केली. तथापि युद्धातील कटू अनुभवांमुळे तो शांततावादी बनला. राजकरणात तो डाव्या विचारसरणीचा होता. १९१७ मध्ये त्याच्या शांततावादी विचारांमुळे त्याला कारावास भोगावा लागला. तुरुंगात असतानाच त्याने डी वांडलुंग (१९१९, इं. शी. ट्रान्सफिगरेशन) हे आपले पहिले नाटक लिहिले. अभिव्यक्तिवादी तंत्राने लिहिलेल्या ह्या नाटकातील देशभक्त नायक युद्धाच्या भीषण परिणामांच्या प्रचीतीतून मानवतावादी क्रांतिकारक बनतो. पुढे कुर्ट आइस्नर ह्या समाजवादी पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली १९१८ मध्ये झालेल्या अपयशी म्यूनिक-उठावात भाग घेतल्याबद्दल टोलरला पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली (१९१९). ह्याच काळात त्याने मास मेन्श (१९२१, इं. भा. मॅन अँड द मासेस, १९२४) व डी मशिनेन श्टुर्मर (१९२२, इं. भा. द मशीन – रेकर्स, १९२३) ह्या आपल्या गाजलेल्या नाट्यकृती लिहिल्या. ध्येयवाद्यांचा भ्रमनिरास ह्या दोन्ही नाट्यकृतींतून प्रत्ययास येतो. तुरुंगात असताना त्याने केलेल्या कविता गेडिश्टे डेअर गेफांगनेन (१९२१, इं. शी. पोएम्स ऑफ द इंप्रिझन्ड) आणि दस श्वाल्बेनबूख (१९२३, इं. भा. द स्वॅलो-बुक, १९२४) ह्या दोन संग्रहांत प्रसिद्ध झाल्या. कारागृहात त्याने विविध व्यक्तींना लिहिलेल्या सुंदर, भावस्पर्शी पत्रांचा मराठी अनुवाद वि. स. खांडेकर यांनी तुरुंगातील पत्रे (३ भाग, १९४७–४८) ह्या नावाने केला आहे.
‘तुरुंगात लिहिलेल्या उपर्युक्त नाट्यकृतींखेरीज टोलरचे इतर उल्लेखनीय नाट्यलेखन असे : हिंकेमान (१९२४, इं. भा. ब्रोकन ब्राउ १९२६), होप्ला! व्हिअर लेबेन (१९२७, इं. शी. माइंड, वी लिव्ह इं. भा. होप्ला, १९२८). युद्धविरोध आणि क्रियाशील मानवतावाद त्याच्या नाट्यकृतींतून प्रकर्षाने प्रत्ययास येतात. फॅसिझमलाही त्याचा कडवा विरोध होता. व्होटान अन्चेन्ड ह्या आपल्या प्रहसनात त्याने हिटलरचे विडंबन केले होते. त्याचे निबंध ब्रीफे आउस डेम गिफेंग्निस (१९३६) ह्या नावाने संगृहीत केलेले आहेत.
नाझींनी त्याच्या लेखनावर बंदी घातली होती. १९३३ साली जर्मनीतील राजकीय स्थितीच्या दडपणामुळे टोलरने देश सोडला व तो ब्रिटनमध्ये आला. तेथे त्याने आयने यूगेंड इन डॉइशलांड (१९३४, इं. भा. आय वॉज अ जर्मन, १९३४) हे आपले आत्मचरित्र लिहिले. १९३६ मध्ये तो अमेरिकेत आला. त्यानंतर तीन वर्षांनी न्यूयॉर्क येथे दारुण निराशेच्या भरात गळफास लावून त्याने आत्महत्या केली.
संदर्भ : Willebrand, W. A. Ernst Toller and His Ideology, 1945.
देव, प्रमोद