झाक्स, नेली : (१० डिसेंबर १८९१–१२ मे १९७०). जर्मन ज्यू कवयित्री आणि लेखिका. बर्लिनमध्ये जन्मली. वयाच्या सतराव्या वर्षापासून काव्यलेखन करू लागली. तिची आरंभीची कविता स्वच्छंदतावादी वळणाची असली, तरी सांकेतिक स्वरूपाची आहे. नाझीवादाच्या प्रभावकाळात जर्मनीत राहणे अशक्य झाल्यामुळे १९४० साली स्वीडिश कादंबरीकर्त्री ⇨सेल्मा लागरव्ह  (१८५८–१९४०) हिच्या साहाय्याने तिने स्वीडनचा आश्रय घेतला. तेथे ती स्वीडिश भाषा शिकली आणि जर्मन काव्यांचे स्वीडिश अनुवाद करू लागली. तेथील वास्तव्यात तिने केलेल्या कवितांतून नाझी राजवटीखाली चिरडल्या गेलेल्या ज्यू समाजाच्या व्यथावेदना उत्कटपणे व्यक्त झालेल्या आहेत. ‘बट ईव्हन द सन हॅज नो होम’ (१९४८ ) आणि ‘एक्लिप्स ऑफ द स्टार्स’ (१९५१) ह्या इंग्रजी शीर्षकार्थांचे काव्यसंग्रह त्या दृष्टीने उल्लेखनीय आहेत. ‘एली : अ मिरॅकल प्ले ऑफ द सफरिंग इझ्राएल’ (इंग्रजी शीर्षकार्थ) हे १९५० मध्ये खाजगी वितरणासाठी प्रसिद्ध झालेले तिचे नाटक प. जर्मनीत पोहोचले व तेथे अत्यंत लोकप्रिय झाले. १९६५ साली जर्मन प्रकाशकांतर्फे तिला शांततेचे पारितोषिक देण्यात आले आणि १९६६ मध्ये इझ्राएलच्या सॅम्युएल जोसेफ ॲग्नन ह्यांच्याबरोबर साहित्यातील नोबेल पारितोषिकाचा बहुमान तिला लाभला. स्टॉकहोम येथे ती निधन पावली.

कुलकर्णी, अ. र.