टेमिन, हॉवर्ड मार्टिन : (? १९३५ – ). अमेरिकन शास्त्रज्ञ. त्यांनी रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज नावाच्या विषाणुजन्य (व्हायरसापासून उत्पन्न होणाऱ्या) एंझाइमाचा (जीवरासायनिक विक्रिया घडवून आणण्यास मदत करणाऱ्या पदार्थाचा) शोध लावला. ⇨ रेनातो दलबेक्को, ⇨डेव्हिड बॉल्टिमोर व टेमिन यांना १९७५ चे वैद्यकाचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. पोषक पेशीतील जननिक सामग्री [⟶ आनुवंशिकी] व अर्बुद-विषाणू (नवीन पेशींच्या वाढीमुळे निर्माण होणारी आणि शरीरास निरुपयोगी असणारी गाठ म्हणजे अर्बुद तयार होण्यास कारणीभूत असणारे विषाणू) यांच्यातील आंतर-क्रियांसंबंधी त्यांनी लावलेल्या शोधांबद्दल ते देण्यात आले. या तिघांच्या कार्यामुळे मानवास होणाऱ्या ठराविक अर्बुदांना कारणीभूत होणारे विषाणू शोधून काढता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तसेच अशा प्रकारच्या संबंधांचा अभ्यास करण्यास उपयुक्त असलेले तंत्र निर्माण झाले आहे. दलबेक्को यांच्या संशोधनाने इतर दोघांच्या संशोधनाचा पाया घातला गेला. बॉल्टिमोर यांनीही स्वतंत्रपणे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज शोधून काढले. ज्याची जननिक सामग्री रिबोन्यूक्लिइक अम्ल (आरएनए) [⟶ न्यूक्लिइक अम्ले] असते, असा विषाणू या एंझाइमामुळे स्वतःची डीऑक्सिरिबोन्यूक्लिइक अम्ल (डीएनए) नक्कल निर्माण करू शकतो.
टेमिन यांचा जन्म फिलाडेल्फिया येथे व शिक्षण स्वार्थमोर महाविद्यालयात झाले. नंतर त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये दलबेक्को यांच्या हाताखाली डॉक्टरेटच्या प्रबंधाचे काम केले (१९५५–५९). तेथेच त्यांनी आपले अर्बुद-विषाणूवरील संशोधन सुरू केले. ते मॅक ऑर्ड्ल मेमोरियल लॅबोरेटरी (युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन) येथे अर्बुदविज्ञान व अर्बुद संशोधनाचे प्राध्यापक आहेत.
आरएनए अर्बुद-विषाणूमुळे कर्करोग कसा होतो यासंबंधीचा अभ्यास हे त्यांचे महत्त्वाचे कार्य होय. १९६४ साली त्यांनी पुढील शक्यता सुचविली : प्रथम विषाणुजन्य आरएनए ची डीएनए मध्ये नक्कल होते व नंतर तिचे पोषक पेशीजन्य डीएनए मध्ये संकलन होते. शिवाय डीएनएची नंतर आरएनए मध्ये नक्कल होते, असेही त्यांचे मत होते. मात्र ही क्रिया उलट न होणारी म्हणजे एकेरी असल्याने बहुतेक जीववैज्ञानिकांना मान्य झाली नाही परंतु १९७० च्या मेमध्ये टेमिन व बॉल्टिमोर यांनी स्वतंत्रपणे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज या एंझाइमाचा शोध जाहीर केला. त्यामुळे उलट्या क्रियेचे म्हणजे जननिक (आनुवंशिक) वृत्त पुढे कसे जाते किंवा डीएनए मधून आरएनए मध्ये जाऊ शकते, असे दाखविता आले. हे मत आधीच्या सिद्धांताविरुद्ध आहे. कारण जननिक वृत्त न्यूक्लिइक अम्ल (डीएनए) ते न्यूक्लिइक अम्ल (आरएनए) ते प्रथिने असे जाते असा पूर्वीचा सिद्धांत होता. मात्र टेमिन व बॉल्टिमोर यांच्या मते हे वृत्त प्रथिन ते न्यूक्लिइक अम्ल असे जाते. या दोघांनी स्वतंत्रपणे संशोधन केले असून ते नेचर या नियतकालिकाच्या एकाच (२७ जून १९७०) अंकात प्रसिद्ध झाले.
ठाकूर, अ. ना.