ल्वो ग्वान-जुंग : (चौदावे शतक). चिनी कादंबरीकार. शान्सी प्रांतातील ताइयूआन (थाइयूआन) येथला तो रहिवासी. सानग्वो येन-ई (इं. शी. इव्हेंट्स ऑफ द थ्री स्टेट्स), ‘द रोमान्स ऑफ द स्वै अँड थांग डिनॅस्टीज’ (इं. शी.) आणि ‘द सप्रेशन ऑफ द सॉर्सरस्स रिव्होल्ट’ (इं.शी.) ह्या त्याच्या कादंबऱ्या. ‘द मीटिंग ऑफ द ड्रॅगन अँड द टायगर’ (इं. शी.) ही एक संगीतिकाही त्याने लिहिली.

‘इव्हेंट्स ऑफ द थ्री स्टेट्स’ ही त्याची सर्वोत्कृष्ट कादंबरी. ही एक ऐतिहासिक कादंबरी असून तिच्याशी संबंधित असलेल्या ऐतिहासिक कालखंडाच्या (इ. स. २२०-२८०) अधिकृत इतिहासाच्या आधारे त्याने ती लिहिली आहे परंतु त्याने लोकांत प्रचलित असलेल्या अनेक कथांचाही उपयोग आपल्या ह्या कादंबरीसाठी करून घेतला. इतिहासाची चौकट कायम ठेवून निवेदन मात्र त्याने नाट्यात्म केल्याचे दिसून येते. इतिहासातील अनेक नावांना त्याने एक वेगळा जिवंतपणा प्राप्त करून दिला. ह्या कादंबरीतील काही व्यक्तिरेखांना तर लोकमानसात अनेक शतके देवत्व प्राप्त झाले होते. जपान, कोरिया आणि अन्य पूर्व आशियाई देशांतील संस्कृतीवरही ह्या कादंबरीचा प्रभाव पडला आहे.

व्हांग इ. शू. (इं.)  कुलकर्णी, अ. र. (म.)