टेटू : (हिं.सोरा, आरलू गु. पोडवेल क. अळंगी, मोक्का सं. दीर्घवृंता, श्योणक इं. इंडियन ट्रम्पेट फ्लॉवर लॅ. ऑरोक्सायलम इंडिकम कुल-बिग्नोनिएसी). सु. आठ ते बारा मी. उंचीचा हा लहान पानझडी वृक्ष पश्चिमेकडील रूक्ष प्रदेश सोडला, तर भारतात सर्वत्र दाट जंगलात आढळतो शिवाय श्रीलंका, मलाया, कोचीन चायना येथेही आढळतो. भारतात विशेषतः पू. हिमालय, कोकण, उ. कारवार व निलकुंडजवळच्या दाट जंगलात सापडतो. ह्याची सर्वसामान्य लक्षणे टेटू कुलात [⟶ बिग्नोनिएसी] वर्णिल्याप्रमाणे असतात. साल फिकट तपकिरी व नरम असून ती कापल्यावर हिरवा रस स्रवतो. पाने समोरासमोर, संयुक्त, मोठी (१·२ ते १·५ मी.) दले तीन ते चार जोड्या असून सर्वांत खालची जोडी दोनदा पिसासारखी विभागलेली असते. फांद्यांच्या टोकाकडे सरळ अठरा ते तीस सेंमी. लांब मंजरीवर मे ते ऑगस्टमध्ये मोठी, दुर्गंधी, गर्द लाल, मांसल फुले येतात पुष्पमुकुट पांढरट किंवा गर्द जांभळा, घंटेसारखा व पाच पाकळ्यांचा असून त्याखालचा भाग (संवर्त) सुद्धा घंटाकृतीच असतो. केसरदले पाच व बहिरागत (बाहेर झुकलेली) असून दोन ऊर्धस्थ किंजदलांच्या किंजपुटात दोन कप्पे व त्यांत अनेक बीजके असतात [⟶ फूल]. बोंड (फळ) तडकून त्याची दोन शकले होतात बोंड ३०–९० × ५–८ सेंमी. तलवारीच्या म्यानासारखे लांबट व दोन्ही टोकांस निमुळते, कठीण, काहीसे चपटे असते. बिया अनेक, सपक्ष, सपाट, सु. सहा सेंमी. लांब असतात. या झाडाचे लाकूड फक्त साध्या घरबांधणीत किरकोळ उपयोगाचे आहे. खोडाची साल व फळे औषधी असून शिवाय त्यांतील टॅनिनाचा रंगविण्यास वगैरे उपयोग होतो तसेच लाकडाचा उपयोग आगपेटीकरिता होतो. मुळाची साल स्तंभक (आकुंचन करणारी) व पौष्टिक असून अतिसार व आमांशावर गुणकारी असते. मुळाच्या सालीचा अंतर्भाव ‘दशमुळात’ होतो. बिया खाद्य असून खोडाच्या सालीचे चूर्ण हळदीत मिसळून घोडे व बैल यांच्या दुखापत झालेल्या पाठीस लावतात. क्षयरोगावर मुळांचा उपयोग करतात. कोवळी फळे वायुनाशी आणि दीपक (भूक वाढविणारी) असतात. गावातील लोक खोडाची साल पोटदुखीवर घेतात. कानातून होणाऱ्‍या स्रावावर मुळाच्या सालीचे चूर्ण तिळेलात कढवून वापरतात.

नवलकर, भो. सुं.