टेक्नेशियम : धातुरूप मूलद्रव्य. चिन्ह Te. अणुक्रमांक (अणुकेंद्रातील प्रोटॉनांची संख्या) ४३ अणुभार ९९ ⇨आवर्त सारणीत ७ अ गटात मँगॅनिजाच्या खाली व ऱ्हीनियमाच्या वर स्थान ऑक्सिडीकरण अवस्था ४, ६ व ७ [⟶ ऑक्सिडीभवन] वितळबिंदू २,२००° से. उकळबिंदू ३,९२७° से. घनता ११·४९ ग्रॅ./सेंमी.३ विद्युत् विन्यास (अणूमधील इलेक्ट्रॉनांची मांडणी) २, ८, १८, १४, १ समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) एकूण तेरा असून सर्व किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकणारे) व त्यांचे अणुभार ९२ ते १०७ च्या दरम्यान आहेत यांपैकी ९९ अणुभाराचा समस्थानिक सर्वांत स्थिर असून त्याचा अर्धायुकाल (मूळची किरणोत्सर्गाची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) २ X १०५ वर्षे आहे.
इतिहास : मेंडेलेव्ह यांनी ज्या वेळी त्यांची पहिली आवर्त सारणी तयार केली, तेव्हा ७ अ गटात मँगॅनिजाच्या खाली दोन जागा रिकाम्या ठेवल्या होत्या. मोझली यांनी केलेल्या संशोधनानुसार त्या रिकाम्या जागांची, ४३ व ७५ यांची, निश्चिती पटलेली होती. नोडॅक, टॅक व बेर्ख यांनी प्लॅटिनम व कोलंबाइटाच्या काही खनिजांची क्ष-किरणांनी पहाणी केली त्या वेळी या मूलद्रव्याचे अस्तित्व आढळून आले. ४३ जागेवरील मूलद्रव्याला त्यांनी मेसुरियम (Ma) असे नाव दिले. त्या आधी त्या अज्ञात मूलद्रव्याला एका-मँगॅनीज असे म्हणत. नंतर १९३७ साली मॉलिब्डेनमावर ड्यूटेरॉनांचा मारा करून सी. पेऱ्ये व ई. सेग्रे यांनी ४३ या मूलद्रव्याचे अनेक किरणोत्सर्गी समस्थानिक शोधून काढले. त्याच वेळी या नव्या मूलद्रव्याचे काही रासायनिक गुणधर्मही लक्षात आले. ड्यूटेरॉन कणांऐवजी न्यूट्रॉन कणांचा मारा मॉलिब्डेनमावर करून टेक्नेशियम मिळू शकते. युरेनियमाच्या अणुकेंद्राचे भंजन करूनही टेक्नेशियम मिळते. अशा प्रकारे टेक्नेशियम हे मूलद्रव्य कृत्रिम पद्धतीने बनविलेले पहिले मूलद्रव्य होय.
टेक्नेशियमाची ऑक्साइडे (TeO2, TeO7) व सल्फाइडे (Te2S7) उपलब्ध आहेत. हायड्रोजनाच्या साहाय्याने सल्फाइडाचे १०००°–११००° से. तापमानास ⇨ क्षपण करून टेक्नेशियम धातू मिळविता येते. भूकवचातील युरेनियमाचे स्वयंभंजन होऊन तयार झालेले टेक्नेशियम सूक्ष्मप्रमाणात आढळते. टेक्नेशियमाची स्फटिकीय संरचना ऱ्हीनियम, ऑस्मियम व रूथेनियम यांच्याशी समरूप आहे. त्याचा महत्त्वाचा आयन (विद्युत् भारित अणुगट) TeO4 असून त्यापासून परटेक्नेट संयुग मिळते. ते परमँगॅनेट व परऱ्हॅनेट यांच्या मालिकेतील आहे. टेक्नेशियम धातू फ्लॅटिनमासारखी दिसते व सामान्यतः करड्या चूर्णाच्या रूपात मिळते. या धातूचे षट्कोणाकार स्फटिकांच्या रूपात स्फटिकीकरण होते. ती ११·२° के. तापमानाखाली अतिसंवाहक [⟶ अतिसंवाहकता] बनते. अनेक देशांमधील अणुकेंद्रीय संशोधनामध्ये या मूलद्रव्याचा अभ्यास चालू असून त्यात बरीच प्रगती झालेली आहे. टेक्नेशियमाची संयुगे व त्याच्या मिश्रधातू क्षरणरोध करण्यासाठी (गंजण्यास रोध करण्यासाठी) उपयुक्त आहेत, असे आढळून आले आहे.
अणुभट्टीतील उत्पादनांतही टेक्नेशियम तयार होते. त्याचा भविष्यकाळात उपयोग करणे शक्य आहे. अशा प्रकारे मिळणाऱ्या या मूलद्रव्याच्या सापेक्ष विपुलतेमुळे त्याचा भौतिक व रासायनिक पद्धतींनी अधिक अभ्यास करता येणे शक्य आहे.
मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्राने सायरस अणुभट्टीत मिळणाऱ्या मॉलिब्डेनम (९९) पासून टेक्नेशियम (९९ एम) हा समस्थानिक जरुरीनुसार तयार करणारे एक साधे उपकरण तयार केले आहे. या उपकरणापासून टेक्नेशियम (९९ एम) परटेक्नेटेटाच्या स्वरुपात मिळतो. हा समस्थानिक रुग्णालयात रोगनिदानासाठी उपयुक्त ठरला आहे. या उपकरणापासून मिळणारा टेक्नेशियम (९९ एम) शुद्ध स्वरूपाचा असून त्यापासून इतर प्रमाणित रसायनेही तयार करता येतात.
पॉल डब्ल्यू. मेरिल यांनी १९५२ साली टेक्नेशियमाच्या वर्णरेषा S प्रकाराच्या ताऱ्यांच्या वर्णपटांत आढळून आल्याचे नमूद केले आहे. हा शोध ताऱ्यांची उत्क्रांती व अणुकेंद्रांचे संश्लेषण यांसंबंधींचा महत्त्वाचा पुरावा समजला जातो.
पहा : ऱ्हीनियम.
कारेकर, न. वि.