टिचनर, एडवर्ड ब्रॅडफर्ड : (११ जानेवारी १८६७–३ ऑगस्ट १९२७). ब्रिटिश–अमेरिकन मानसशास्त्रज्ञ. जन्म इंग्लंडमधील चिचेस्टर येथे. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्याने शरीरक्रियाविज्ञानाचा आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. नंतर लाइपसिक येथे त्याने ⇨ व्हिल्हेल्म व्हुंटच्या हाताखाली संशोधन करून १८९२ मध्ये डॉक्टरेट संपादन केली. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाने त्याला इथिका येथे नव्यानेच स्थापन केलेल्या मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत व्यवस्थापक म्हणून येण्याचे निमत्रंण याच वर्षी दिले. त्याप्रमाणे तो तेथे मानसशास्त्राचा सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाला. १८९५ मध्ये तो मानसशास्त्राचा प्राध्यापक आणि अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजी ह्या नियतकालिकाचा सहसंपादक झाला. १९०१ मध्ये त्याचा एक्स्पेरिमेंटल सायकॉलॉजी, हा ग्रंथ प्रथम दोन प्रचंड खंडांत प्रसिद्ध झाला. याच ग्रंथाचा तिसरा व चौथा खंड १९०५ मध्ये प्रसिद्ध झाला. १९०४ मध्ये त्याने ‘द सोसायटी ऑफ एक्स्पेरिमेंटल सायकॉलॉजी’ ह्या संस्थेची स्थापना केली. १९१० मध्ये त्याची कॉर्नेल विद्यापीठातील मानसशास्त्राच्या ‘सेज प्रोफेसर’ ह्या बहुमानपदी नेमणूक झाली. १९२१ मध्ये तो अमेरिकन जर्नल ऑफ सायकॉलॉजीचा संपादक झाला. सुमारे एकतीस वर्षे तो ह्या नियतकालिकाचा प्रथम सहसंपादक व नंतर संपादक होता. न्यूयॉर्क संस्थानातील इथिका येथे तो निधन पावला.
मानसशास्त्रीय संशोधनासाठी व्हुंटने अंगीकारलेली घटकान्वेषी (एलिमेंटॅरिस्टिक) दृष्टी आणि अंतर्निरीक्षण पद्धती टिचनरने पुरस्कारली. प्रायोगिक उपकरणे आणि नियंत्रित अंतर्निरीक्षण पद्धतीचा ह्या घटकलक्षी दृष्टिकोनात प्रामुख्याने समावेश होतो. ही पद्धती व हा दृष्टिकोन मानसशास्त्रात ⇨ रचनालक्षी मानसशास्त्र म्हणून ओळखला जातो. कॉर्नेलमधून बाहेर पडलेले त्याचे अनेक विद्यार्थी पुढे ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ म्हणून नावलौकिकास चढले. कॉर्नेलमधील त्याचे कार्य अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. त्याचा व्यासंग, उत्कृष्ट अध्यापन व मार्गदर्शन, इंग्रजीवरील प्रभुत्व इ. गुणांमुळे अनेक विद्यार्थी कॉर्नेलकडे आकृष्ट झाले. सुमारे ५० वर्षांपूर्वीच्या मानसशास्त्रावर टिचनरचा आणि हार्व्हर्ड विद्यापीठातील म्यून्स्टेरबेर्कचा पगडा दिसून येतो. व्हुंटप्रणीत रचनालक्षी मानसशास्त्राचा आणि अंतर्निरीक्षण पद्धतीचा त्याने पुरस्कार केला. त्याचे इतर महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : एलिमेंटरी सायकॉलॉजी ऑफ फीलींग अँड अटेन्शन (१९०८), लेक्चर्स ऑन द एक्स्पेरिमेंटल सायकॉलॉजी ऑफ द थॉट-प्रोसेसेस (१९०९) व सिस्टिमॅटिक सायकॉलॉजी : प्रोलिगॉमेना (१९२९). त्याने मानसशास्त्रावरील अनेक जर्मन पाठ्यपुस्तकांची इंग्रजीत भाषांतरेही केली असून त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. मानसशास्त्रावर त्याने सु. २०० संशोधनपर लेखही प्रसिद्ध केले.
सुर्वे, भा. ग.
“