टॉयन्बी, आर्नल्ड जोसेफ : (१४ एप्रिल १८८९–२२ ऑक्टोबर १९७५). जगप्रसिद्ध इंग्रज इतिहासकार. आर्नल्ड टॉयन्बी ह्या अर्थशास्त्रज्ञाचा पुतण्या. लंडन येथे जन्म. विंचेस्टर व बेल्यल महाविद्यालयांत (ऑक्सफर्ड विद्यापीठ) शिक्षण घेऊन ते ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन अधिछात्र म्हणून काम करू लागले. तत्पूर्वी काही दिवस त्यांनी अथेन्समधील ब्रिटिश पुरातत्त्वीय विद्यालयात अध्ययन केले. तेथे आलेल्या अनुभवांतूनच त्यांची पुढे इतिहासाच्या तत्त्वज्ञानाची भूमिका तयार झाली. पुढे १९१९ मध्ये ते आधुनिक ग्रीक भाषा व इतिहास ह्या विषयांत लंडन विद्यापीठात प्राध्यापक झाले. तेथे त्यांनी १९२४ पर्यत काम केले. नंतर १९२५ मध्ये ते ‘रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स’ ह्या संस्थेत संचालक झाले आणि त्याच वेळी ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ या संस्थेत आंतरराष्ट्रीय इतिहास ह्या विषयाचा संशोधन-प्राध्यापक म्हणून त्यांनी अध्यापन व संशोधन करण्यास सुरुवात केली. ह्या दोन्ही पदांवर ते निवृत्त होईपर्यंत म्हणजे १९५६ पर्यंत होते. दरम्यान १९५० व १९५४ मध्ये त्यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात अभ्यागत व्याख्याता म्हणून काम केले. १९५६ मध्ये अमेरिकेने ‘ए चॅम्पीयन ऑफ ऑनर’ म्हणून त्यांचा बहुमान केला. दोन्ही महायुद्धांच्या काळात ते ब्रिटिश परराष्ट्रखात्यात काम पाहत होते आणि १९१९ व १९४६ ह्या साली पॅरिस येथे भरलेल्या शांतता परिषदांत त्यांनी ब्रिटनच्या प्रतिनिधिमंडळातून भाग घेतला होता. खासगी जीवनात टॉयन्बीनी १९१३ मध्ये रोझालिंड मरे ह्या युवतीशी लग्न केले. १९४६ मध्ये तिच्याशी त्यांनी घटस्फोट घेतला व आपल्याबरोबर काम करणाऱ्या मर्जेसो बोल्टर ह्या स्त्रीबरोबर दुसरा विवाह केला. निवृत्तीनंतर उर्वरित आयुष्य त्यांनी इतिहासलेखन-संशोधनात व्यतीत केले.
टॉयन्बींनी मुख्यत्वे इतिहास या विषयावरच बहुतेक पुस्तके लिहिली. त्यांपैकी ए स्टडी ऑफ हिस्टरी हा त्यांचा महत्त्वपूर्ण व प्रमुख ग्रंथ. या बारा खंडांच्या (१९३४–६१) भव्य व चिरस्थायी ग्रंथात त्यांनी आपल्या आयुष्यात इतिहासकार ह्या दृष्टीने जे काही संशोधन केले, त्यावरून तत्संबंधी काढलेली तात्त्विक अनुमाने मांडली आहेत. इतिहासाची उपपत्ती लावणे म्हणजे कोणत्याही संस्कृतीची वृद्धी, विकास, विघटन आणि विनाश ज्या नियमांना अनुसरून होतो, त्यांचा शोध घेणे होय, अशी टॉयन्बी ह्यांची भूमिका होती. त्यांच्या मते मानवी इतिहास हा अशा विकसित होत जाणाऱ्या आणि ऱ्हास पावणाऱ्या संस्कृतींचा इतिहास असतो राष्ट्रांचा किंवा प्रदेशांचा नसतो. इतिहासाच्या दृष्टीने पाहता एकसंध संस्कृतीतील सामावलेल्या अनेक राष्ट्रांमध्ये आपण जे भेद पाडतो ते कृत्रिम असतात. अशा विकसित होऊन विघटित झालेल्या सव्वीस भिन्न संस्कृती टॉयन्बी ह्यांनी शोधून काढल्या आहेत किंवा मानल्या आहेत. ह्या संस्कृतींच्या इतिहासाचे समीक्षण केले, तर त्यांच्यात एक समान आकारबंध दिसून येतो आणि काही समान नियमांना अनुसरून त्यांचा विकास आणि अवनती झाल्याचे आढळते. त्यांचा उद्भव आणि विलय ह्या दोन बिंदूंमध्ये घडलेल्या त्यांच्या कारकीर्दीत एक समान लय प्रतीत होते, असा टॉयन्बी ह्यांचा निष्कर्ष होता. हा दृष्टिकोन काहीसा ओस्व्हाल्ट स्पेंग्लर ह्यांच्या दृष्टिकोनासारखा आहे पण टॉयन्बी ह्यांनी त्याच्या समर्थनार्थ इतिहासातील अनेक घटनांच्या तपशिलांचा पुरावा देण्याचा प्रयत्न केला आहे. हा दृष्टिकोन स्पेंग्लरपेक्षा अधिक समृद्ध आहे. टॉयन्बी ह्यांना प्रतीत झालेली ही लय अशी की, प्रत्येक संस्कृतीला वृद्धीची आणि अवनतीची अवस्था असते आपल्या वृद्धीच्या, विकासाच्या काळात संस्कृती स्वतःपुढील आव्हानांना परिणामकारक सर्जनशील रीतीने प्रतिसाद द्यायला समर्थ असते अवनतीच्या काळात स्वतःपुढील संधीचा लाभ उठविण्याची, अडचणींवर मात करण्याची तिची कुवत मंदावते पण ही वृद्धी किंवा अवनती सुसंगत रीत्या, सातत्याने होत नसते. उदा., विघटनाच्या अवस्थेची कधी कधी संस्कृती एकाएकी पुनरुत्थानाची झलक दाखविते पण त्यानंतर लगेच ती अधिक वेगाने अधोगतीकडे धावते. संस्कृतीच्या अवनतीची टॉयन्बी यांनी मांडलेली काही महत्त्वाची कारणे म्हणजे सामाजिक संस्थांचे जाड्य, संस्कृतीला सर्जनशीलतेचे भोगावे लागणारे अटळ प्रायश्चित्त, अंतर्गत व बाह्य कामगारवर्गाची झालेली वाढ आणि मूळच्या सर्जनशील असलेल्या अल्पसंख्य वर्गाचे वरचष्मा गाजवू पाहणाऱ्या अल्पसंख्य वर्गात झालेले रूपांतर ही होत. टॉयन्बींच्या इतिहासाच्या ह्या विवरणामागे एक गूढवादी, धर्मप्रधान दृष्टिकोन आहे, हे नमूद करणेही आवश्यक आहे. त्यांच्या ए स्टडी ऑफ हिस्टरी ह्या बारा खंडांच्या ग्रंथात हा दृष्टिकोन प्रतिभाशाली कल्पकतेने आणि समृद्ध पुराव्याच्या आधारे मांडण्यात आला आहे. ह्याबरोबरच इतिहासाच्या विकासाचे एकच समान सूत्र सर्वत्र आढळते, ह्या टॉयन्बींच्या मध्यवर्ती सिद्धांतावर कडाडून हल्लेही करण्यात आले आहेत. टॉयन्बींच्या लिखाणात तपशिलांच्या चुका तर आढळतात पण त्याहीपेक्षा आपला सिद्धात सिद्ध करण्यासाठी त्यांना पुराव्यांची ओढाताण करावी लागते, असे आक्षेप अनेक इतिहासकारांनी काढले आहेत. टॉयन्बींनी वरील पुस्तकांव्यतिरिक्त आणखी काही पुस्तके लिहिली. त्यांपैकी नॅशनॅलिटी अँड वॉर (१९१५), द वेस्टर्न क्वेश्चन इन ग्रीक अँड टर्की (१९२२), ग्रीक हिस्टॉरिकल थॉट (१९२४), ग्रीक सिव्हिलिझेशन ॲड कॅरॅक्टर (१९२४), सर्व्हे ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स (१९२३–२७), जर्नी टू चायना (१९३१), ब्रिटिश कॉमनवेल्थ रिलेशन्स (१९३४), वॉर ॲड सिव्हिलिझेशन (१९५१), द वर्ल्ड अँड द वेस्ट (१९५३), ॲन हिस्टॉरिकल ॲप्रोच टू रिलिजन (१९५६), द चॅलेंज ऑफ अवर टाइम (१९६६) वगैरे काही ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
प्राध्यापकपदावरून निवृत्त झाल्यानंतर टॉयन्बींनी आपले सर्व लक्ष लेखनकार्यात केंद्रित केले. धर्म हाच एकमेव जागतिक ऐक्याचा मार्ग आहे, हे मत त्यांनी ॲन हिस्टॉरिकल ॲप्रोच टू रिलिजन या ग्रंथात मांडले, तर पूर्वीच्या संस्कृतींचा आकडा त्यांनी आपल्या रिकंसिडरेशन्स या ए स्टडी ऑफ हिस्टरीच्या शेवटच्या खंडात बदलला आणि त्यांतील १३ स्वतंत्र संस्कृत्या असून १५ अंकित संस्कृत्या होत्या, असे मत प्रतिपादन केले. तसेच जर अमेरिका व रशिया यांनी जागतिक ऐक्यासाठी एकमेकांत समन्वय साधला नाही, तर चीन जागतिक ऐक्याच्या बाबतीत पुढाकार घेईल. कारण त्याच्या ऐतिहासिक परंपरा आणि धर्म या गोष्टी सर्वाना आकर्षित करणाऱ्या आहेत, असेही मत मांडले.
संदर्भ : Wagar, W. W. The City of Man : Prophecies of a World Civilization in Twentieth Century Thought, New York, 1963.
देशपांडे, सु. र.
“