टायबर : इटलीतील पो नदीच्या खालोखाल महत्त्वाची नदी. लांबी ४०५ किमी. तिच्या काठावर रोम वसले आहे. रोमन लोक या नदीला पित्यासमान (फादर टायबर) मानतात. काही प्राचीन लेखक नदीचे मूळ नाव अल्‌बुला सांगतात. टायबेरिनस राजाच्या काळात नदीचे नाव टायबरस व पुढे टायबर पडले.

ॲपेनाइन्स पर्वताच्या फूमायॉलॉ शिखराजवळ समुद्रसपाटीपासून १,२६८ मी. उंचीवर टायबर उगम पावते व दक्षिणवाहिनी होऊन तस्कनी, अंब्रिया, लेशियम प्रांतातून वाहत जाऊन रोमच्या नैर्ऋत्येस २७ किमी.वर व जवळच्या फ्यूमीचीनॉ येथे, अशा दोन मुखांनी टिरीनियन समुद्रास मिळते. चीत्ता दी कास्तेल्लो, ऊंबेतींदे, ऑर्ते, रोम ही तिच्या काठावरील महत्त्वाची शहरे असून फ्यूमिचीनॉ मुखापासून ३४ किमी. रोमपर्यंत ही जलवाहतुकीस योग्य आहे. नेरा, आन्येने, पाल्या या प्रमुख उपनद्या असून पाल्या व क्याना प्रवाहांनी ती आर्नो नदीस जोडली गेली आहे. यामुळे रोम–फ्लॉरेन्स असा एक नैसर्गिक मार्ग उपलब्ध झाला आहे. आल्बानो व व्हीकॉ सरोवरांचे पाणी टायबरला मिळते. आतापर्यंत नोंदलेल्या टायबरच्या ४६ महापुरांपैकी १५९५ चा रौद्रतम होता. १८७० च्या पुरात रोमच्या रस्त्यावर ३ मी. पाणी होते. त्यानंतर नदीच्या दोन्ही काठांवर पूरप्रतिबंधक तट बांधण्यात आले.

ओक, द. ह.