टॅगू : दक्षिण कोरियाच्या उत्तर क्याँगसांग प्रांताची राजधानी. लोकसंख्या १०,८२,७५० (१९७०). हे ऐतिहासिक शहर पुसानच्या उत्तर वायव्येस ९० किमी. असून आग्नेय कोरियाचे बरेच वर्षे कारभाराचे, आर्थिक व सांस्कृतिक केंद्र होते. टॅगू लोहमार्ग, सडका आणि हवाईमार्ग यांचे प्रस्थानक असून सेऊल व पुसान यांच्याशी जोडलेले आहे. येथे रेशीम-बाजारपेठ, क्याँगबक राष्ट्रीय विद्यापीठ, याँगनाम विद्यापीठ असून कापडगिरण्या, धातूचे व यंत्रांचे कारखाने आहेत. येथून आसमंतातील सफरचंदे निर्यात होतात. कोरियन युद्धात येथे संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सैन्याचा मोठा तळ होता.
ओक, द. ह.