झ्यूस (स्वेस), एडूआर्ट : (२० ऑगस्ट १८३१–२६ एप्रिल १९१४). ऑस्ट्रियन भूवैज्ञानिक. त्यांनी खंडांच्या उत्पत्तीचा सिद्धांत मांडला. त्यांचा जन्म लंडनला आणि शिक्षण प्राग व व्हिएन्ना येथे झाले. १८५२ साली ते होफम्युझियममध्ये साहाय्यक म्हणून लागले व १८५७ साली व्हिएन्ना विद्यापीठात भूविज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले व १९०१ पर्यंत ते याच पदावर होते.

होफम्युझियममध्ये असताना ब्रॅकिओपॉड प्राण्यांचे शरीर व वर्गीकरण यांवरील त्यांचे लेख प्रसिद्ध झाले, त्यांनी ॲमोनाइटांचे वर्गीकरण रूढ केले आणि इतर कित्येक गटांतील जीवाश्मांचे (प्राण्यांच्या अवशेषांचे) वर्णन केले. १८७५ साली त्यांचे आल्प्स पवर्ताच्या निर्मितीवरील पुस्तक प्रकाशित झाले. त्यामध्ये पर्वतांची आणि खंडांची खालीवर हालचाल होत नाही, पर्वतनिर्मितीत ज्वालामुखीच्या क्रियेचा मर्यादित वाटा असतो आणि आल्प्स व संबंधित पर्वत रेटण्याच्या हालचालींमुळे निर्माण झाल्याचे त्यांनी सुचविले. भूवैज्ञानिक इतिहासात जगभर सर्वत्र झालेल्या भूकवचाच्या हालचालींवर त्यांनी भर दिला. भूकवचातील स्थिर ठोकळ्यांमधील दुर्बल भाग क्षैतिज प्रेरणांनी चुरडले जाऊन भूकवचाच्या बाहेरील भागाला घड्या पडून व काही ठिकाणी तुटून पर्वत निर्माण झाले असल्याचे त्यांचे मत आहे. या हालचालींचे परिणाम ज्यांच्यावर झाले नाहीत व जे प्राचीन पर्वतांचे बनलेले आहेत, असे काही भूभाग असल्याचे त्यांचे मत होते. अशा भूभागांना ढालक्षेत्रे म्हणतात. प्राचीन महासागरांच्या पातळीतील चढ-उतार, शिलारस वरती येणे इ. संबंधित विषयांवरही त्यांनी संशोधन केले.

त्यांनी अनेक लेख व पुस्तके लिहिली असून Des Antlize der Erde (५ खंड, १८८५–१९०७), Entestehung der Alpen (१८७५) व Errinerungen (१९१६) ही पुस्तके महत्त्वाची आहेत. यांपैकी पहिल्या पुस्तकाची नंतरच्या संबंधित अभ्यासावर छाप पडलेली आहे. त्याचे इंग्रजी (फेस ऑफ द अर्थ, १९०४–२४), फ्रेंच आणि इटालियन भाषांत अनुवाद झाले आहे. या पुस्तकात त्यांनी खंड व महासागर यांच्यामध्ये प्राचीन काळी झालेल्या बदलांचा आपल्या सिद्धांताच्या स्पष्टीकरणार्थ उपयोग केला आहे.

इ. स. १८६९ साली ते ऑस्ट्रियाच्या संसदेचे आणि १८७३ साली राइखस्राटच्या कनिष्ठ गृहाचे सभासद झाले. तेथे ते ३० हून अधिक वर्षे लिबरल पक्षाचे नेते होते. रॉयल सोसायटीचे परदेशी सभासदत्व (१८९४), ऑस्ट्रियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे अध्यक्षपद (१८९८–१९११), कॉप्ली पदक (१९०३) इ. बहुमानही त्यांना देण्यात आले. ते व्हिएन्ना येथे मरण पावले.

ठाकूर, अ. ना.