टंकलेखन यंत्र : छापल्याप्रमाणे एकसारख्या अक्षरात ज्याच्या मदतीने लिहिता येते असे यंत्र. अशी सर्वसाधारण यंत्रे ३० X ३५ X २५ सेंमी. अशा आकारमानाची असतात. हे यंत्र लिहिण्याच्या टेबलावर राहू शकते. बराच हस्तलिखित मजकूर या यंत्राने थोड्या वेळात टंकलिखित करता येतो, तसेच त्याच मजकुराच्या ४–६ प्रती एकाच वेळी काढता येतात. तसेच या यंत्राने तक्ते, कोष्टके इ. टंकलिखित करता येतात. शिवाय पुष्कळ प्रतींसाठी मजकुराचा कोरीव फर्मा (स्टेन्सिल) वाढता येतो. या बहुगुणी यंत्राचे विविध प्रकार प्रचारात आहेत. सध्या शासकीय, व्यवसायिक व औद्योगिक क्षेत्रांत हे यंत्र कार्यालयांचा एक अत्यावश्यक भाग झालेले आहे.

इतिहास व विकास : औद्योगिक क्रांतीमुळे काळ, काम व वेग या गोष्टींना फार महत्त्व प्राप्त झाले. कोणतीही गोष्ट जलद होण्यासाठी यंत्राचा वापर आवश्यक ठरला. पण सुवाच्य लेखन ही क्रिया मात्र याला बराच काळ अपवादात्मक राहिली. जलद व सुवाच्य लिहिता येण्यासाठी यंत्राचा वापर करणे अपरिहार्य होते. त्यांपैकी जलद लिहिण्याचा प्रश्न आयझाक पिटमन यांच्या लघुलेखन पद्धतीने काही प्रमाणात सुटला. या पद्धतीमुळे तोंडाने सांगितलेला मजकूर द्रुतगतीने लघुलिपीत लिहिता येत असे. पण त्याचे रूपांतर करून मजकूर नेहमीच्या लिपीत लिहिण्याचे काम मंदगतीने होत असे.

सुवाच्य लिहिण्याची क्रिया जलद होण्यासाठी अठराव्या शतकापासून वैज्ञानिकांचे व यंत्रज्ञांचे प्रयत्न चालू होते. असे प्रयत्न करताना छापखान्याची यंत्रसामग्री त्यांच्या डोळ्यासमोर होती. टंकांची (टाइपांची) जुळवणी करणे व नंतर यंत्राने प्रती काढणे या कृतीला फार वेळ लागतो. म्हणून टंक जुळवण्याचा त्रास कमी केला, तर छपाईचा वेग वाढेल या कल्पनेच्या आधाराने बऱ्याच यंत्रज्ञांनी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न केले.

हेन्‍री मिल या लंडनच्या अभियंत्यांनी एकस्व (पेटंट) घेतलेले असे पहिले टंकलेखन यंत्र १७१४ मध्ये तयार केले. या यंत्राविषयीची फारशी माहिती उपलब्ध नाही, तथापि ते ओबडधोबड व वापरण्यास अवघड होते. यानंतरच्या काळात जर्मनी, फ्रान्स, इटली, ऑस्ट्रिया इ. देशांतही आदिम स्वरूपाची यंत्रे तयार करण्यात आली. नंतर १८२९ मध्ये डिट्रॉइट येथील विल्यम ऑस्टिन बर्ट यांनी ‘टायपोग्राफर’ नावाचे यंत्र तयार केले. हे यंत्रही ओबडधोबडच असून त्यात शाईची गादी वापरलेली होती व त्यावर टंक दाबून छापण्यात येई. १८३३ मध्ये मार्से येथील झेव्हियर प्रोजियन यांनी हाताच्या बोटांनी वापरायाचा मुद्राफलक असलेले यंत्र तयार केले व त्याचे एकस्वही घेतले होते. कागदाची गुंडाळी सातत्याने वापरता येणारे यंत्र १८५० मध्ये जॉन फेअरबँक यांनी तयार केले. त्याच साली ऑलिव्हर एडी यांनी पियानोसारखा मुद्राफलक असलेले व शाईच्या रुळाऐवजी शाईची फीत असलेले यंत्र तयार केले. पुढे १८६८ मध्ये क्रिस्टोफर लेथम शोल्झ, कार्लोस ग्लिडन व सॅम्युएल सूले या अमेरिकन यंत्रज्ञांनी जलद टंकलेखन करण्याचे यंत्र तयार केले. सुरुवातीचे यंत्र ओबडधोबड होते. त्यामध्ये त्यांनी बऱ्याच सुधारणा केल्या व १८७३ मध्ये जेम्स डेन्समोर यांच्यामार्फत फिलो रेमिंग्टन यांच्याशी या यंत्राच्या उत्पादनाविषयी करार केला. पहिले रेमिंग्टन टंकलेखन यंत्र १८७४ मध्ये बाजारात आले. ही यंत्रे बाजारात येऊन त्यांचा खप होऊ लागला व लवकरच त्याचे मूळ ‘शोल्झ’ हे नाव बदलून त्याला रेमिंग्टन हे नाव देण्यात आले. रेमिंग्टन यंत्रात विशेष लक्षणीय असे काही घटक प्रथमच वापरण्यात आले व ते विसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील यंत्रांतही प्रमाणभूत घटक म्हणून चालू राहिले. हे घटक पुढीलप्रमाणे होते : (१) ओळींतील अंतर साधण्याच्या व कागद वाहक परत नेण्याच्या यंत्रणेसह रूळ, (२) अक्षर छापल्यानंतर रूळ जरूर तितका पुढे सरकवणारी सुटका प्रयुक्ती, (३) प्रत्येक टंक यंत्रात एकाच बिंदूवर आपटेल अशा तऱ्हेची टंक तुकड्यांची मांडणी, (४) टंक तुकड्यांचे तरफांच्या व तारांच्या द्वारे चालन आणि (५) मुद्राफलकावरील अक्षरांच्या जागा. अक्षरांच्या जागा अजूनही जवळजवळ त्याच आहेत. या यंत्रात टंक तुकड्यावर एकाच प्रकारचे म्हणजे मोठे (कॅपिटल) अक्षर होते सर्व मजकूर मोठ्या अक्षरांतच छापला जाई. तथापि मोठी व लहान (स्मॉल) अशी दोन्ही प्रकारची अक्षरे वापरण्याची आवश्यकता आणि त्यासाठी बटणांची संख्या मात्र वाढविण्याचे टाळणे ही अडचण नंतरच्या काळात रेमिंग्टन कंपनीने अक्षर-बदल प्रयुक्ती वापरून दूर केली. हिच्यात दुसऱ्या प्रकारच्या अक्षरासाठी रूळ उचलण्याची सोय होती व त्यामुळे टंक तुकड्यावर त्याच अक्षराचे मोठ्या व लहान लिपितील टंक घालणे शक्य झाले. या प्रकारचे यंत्र रे कंपनीने रेमिंग्टन–२ या नावाने १८७८ मध्ये बाजारात आणले.

बॉस्टन येथील जे. बी. हॅमंड यांनी तयार केलेले ‘आयडियल’ टंकलेखन यंत्र १८८४ मध्ये बाजारात आले. या यंत्रातील मुद्राफलक अर्धवर्तुळाकार होता. निरनिराळ्या प्रकारचे टंक यात वापरण्याची सोय असल्यामुळे त्याला बरीच लोकप्रियता मिळाली होती. तथापि नंतरच्या ‘आयडियल’ यंत्रात नेहमीचाच मुद्राफलक वापरण्यात आला.

इ. स. १८९२ मध्ये टॉमस ऑलिव्हर यांनी केलेले टंकलेखन दिसेल असे यंत्र तयार केले. १८९३ मध्ये फ्रँट्स वॅगनर यांनीही तसेच यंत्र तयार केले. हे यंत्र व त्याचे एकस्व जॉन टी. अंडरवुड यांनी विकत घेतले व अंडरवुड टाइपरायटर कंपनीची १८९५ मध्ये स्थापना केली. एल्. सी. स्मिथ अँड ब्रदर्स या कंपनीने तयार केलेल्या ‘स्मिथ प्रिमियर’ या टंकलेखन यंत्रात दोन मुद्राफलक असून त्यांपैकी एक मोठ्या अक्षरांसाठी व दुसरा लहान अक्षरांसाठी असे. अशा प्रकारची बटणांची संख्या दुप्पट असलेल्या मुद्राफलकांची यंत्रेही बाजारात आली. या आणि रेमिंग्टन–२ या यंत्राची बाजारात काही दिवस लोकप्रियतेसाठी स्पर्धा चालून त्यात दुफलकी यंत्रे मागे पडली व पुढे नामशेषही झाली. १९०२ साली स्मिथ कंपनीने तयार केलेल्या यंत्रात मोठ्या अक्षरांसाठी टोपलीच्या आकाराची उचल योजना अंतर्भूत केली होती. १९०० नंतर ए. बी. हेस व एल्. सी. मेयर्स यांनी टंकलेखन यंत्रात बऱ्याच सुधारणा केल्या व १९०६ मध्ये एक नवीन टंकलेखन यंत्र तयार केले. या यंत्रात घर्षण कमी होणारे टंक तुकडे वापरलेले होते. १९०८ मध्ये सायलेंट रायटिंग मशीन कंपनीने अनेक वर्षांच्या प्रयोगानंतर नॉइजलेस (बिनआवाजी) टंकलेखन यंत्र तयार केले. नॉइजलेस हे केवळ व्यापारी नाव होते. कारण इतर यंत्राप्रमाणे याचाही थोडाफार आवाज होईच. १९२९ मध्ये जेम्स रँड यांनी रेमिंग्टन-रँड इनकॉर्पोरेशन या नावाने स्थापन झालेल्या कंपनीसाठी बिनआवाजी यंत्राचे एकस्व घेतले. पण हे यंत्र लोकप्रिय होऊ शकले नाही व त्याचा वापरही कमी होऊ लागला. १९१४ मध्ये वुडस्टॉक टंकलेखन यंत्र बाजारात आले व पुढे त्याचे आर्. सी. ॲलन कॉर्पोरेशनने उत्पादन करण्यास सुरुवात केली. वरील यंत्राखेरीज जॉर्ज योस्ट, फ्रँट्स वॅगनर व एच्. एल्. वॅगनर यांनी १८८५ मध्ये तयार केलेले ‘कॅलिग्राफ’ यंत्र, १८८१ मध्ये ल्युशेन क्रँडल यांनी तयार केलेले ‘प्रिटिंग मशीन’ इ. विविध स्वरूपाची यंत्रे निरनिराळ्या व्यक्तींनी तयार केली होती परंतु ती फारशी प्रचारात राहिली नाहीत. मध्यंतरीच्या काळात अनेक यूरोपियन कंपन्यांनी विविध प्रकारची टंकलेखन यंत्रे तयार केली. यांपैकी सध्या महत्त्वाच्या असलेल्या कंपन्या म्हणजे इटलीतील अंडरवुड-ऑलिव्हेत्ती, जर्मनीतील ऑलिंपिया, ॲडलर, ऑप्टिमा व ट्रायंफ आणि स्वीडनमधील फॅसिट या होत. आ. १ मध्ये टंकलेखन यंत्राची उत्क्रांती दर्शविणाऱ्या काही यंत्रांची चित्रे दिली आहेत.

इ. स. १९०० च्या आधी सुवाह्य (कोठेही सहज वाहून नेता येणारे, पोर्टेबल) टंकलेखन यंत्र तयार करण्याचे प्रयत्न सुरू झाले. कार्यालयात वापरावयाची मोठी यंत्रे लोकप्रिय झाल्यावर सुवाह्य यंत्रांना मागणी येऊ लागली. १९१२ मध्ये कॉरोना कंपनीने अशा यंत्राची प्रतिकृती तयार केली होती. यानंतर रेमिंग्टन–रँड, स्मिथ–कॉरोना, अंडरवुड–इलियट–फिशर आणि रॉयल या चार कंपन्यांनी सुवाह्य यंत्रांचे उत्पादन करण्यास सुरुवात केली. सुवाह्य यंत्रात सुधारणा झाल्यावर ते यंत्र हळूहळू लोकप्रिय होऊ लागले व बहुतेक सर्व कंपन्या अशी यंत्रे तयार करू लागल्या.


विद्युत् टंकलेखन यंत्र : १८७२ मध्ये टॉमस एडिसन यांना विद्युत् टंकलेखन यंत्राचे एकस्व देण्यात आले होते. पण विद्युत् शक्तीचा टंकलेखन यंत्रासाठी प्रत्यक्ष उपयोग विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झाला. ब्लिकेन्सडर्फर टाइपरायटर कंपनीने १९०२ मध्ये व मर्सिडीज या जर्मन उत्पादकांनी १९२१ मध्ये विद्युत् टंकलेखन यंत्र बाजारात आणले. वुडस्टॉक कंपनीचे विद्युत् यंत्र आणि नॉर्थईस्ट इलेक्ट्रिक कंपनीचे ‘इलेक्ट्रोमॅटिक’ हे यंत्र १९२० नंतरच्या दशकात बाजारात आले. १९३२ मध्ये इलेक्ट्रोमॅटिक यंत्राचे हक्क इंटरनॅशनल बिझिनेस मशीन्स (आयबीएम) कॉर्पोरेशन विकत घेतले आणि आयबीएम इलेक्ट्रोमॅटिक या नावाने ते बाजारात आणले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी अशा विद्युत् यंत्रांना विशेष मागणी नव्हती. दुसऱ्या महायुद्धानंतर यंत्रांत बऱ्याच सुधारणा झाल्या व अशा यंत्रांना मागणी येऊ लागली. १९४७ मध्ये अंडरवुड कंपनीचे व १९४८ मध्ये रेमिंग्टन–रँड कंपनीचे, १९५० मध्ये रॉयल कंपनीचे व १९५३ मध्ये आर्. सी. अँलन कंपनीचे अर्ध विद्युत् यंत्र, १९५४ मध्ये स्मिथ–कॉरोनाचे व १९६१ मध्ये आयबीएम चे ‘सिलेक्ट्रिक’ ही यंत्रे बाजारात आली. सुवाह्य विद्युत् यंत्र १९५६ मध्ये आयबीएम ने तयार केले.

आ. १. टंकलेखन यंत्राचे काही प्रकार : (१) वर्ट ‘टायपोग्राफर’ यंत्र (१८२९), (२) शोल्झ व ग्लिडन टंकलेखन यंत्र (१८७४—७५), (३) हॅमंड ‘आयडियल’ टंकलेखन यंत्र (१८८४), (४) विल्यम्स टंकलेखन यंत्र (१८९२—९४), (५) ऑलिव्हर टंकलेखन यंत्र (१८९४), (६) रेमिंग्टन (१९०७), (७) रेमिंग्टन सँडर्ड (१९५०), (८) आयबीएम. एक्झिक्युटीव्ह विद्युत् टंकलेखन यंत्र (१९५९).

स्वयंचलित टंकलेखन यंत्र : व्यापारी क्षेत्रातील कामाचे स्वरूप गुंतागुंतीचे होऊ लागल्यामुळे जलद टंकलेखन करणाऱ्या व हाताने मूळ टंकलिखित केलेल्या सारख्या प्रती तयार करणाऱ्या यंत्राची अधिकाधिक आवश्यकता भासू लागली. स्वंयचलित पियानोसारखी मूलभूत कार्यपद्धती असलेले ‘हूवन’ स्वंयचलित टंकलेखन यंत्र जलद टंकलेखनासाठी प्रथमतः वापरात आले. हे यंत्र अवजड होते व कालांतरने त्याचा वापर कमी झाला. १९२७ मध्ये ‘ऑटोटायपिस्ट’ हे शुल्झ फ्लेयर यंत्र पियानो कंपनीने तयार केले. याची सुधारलेली आवृत्ती अमेरिकन ऑटोमॅटिक टाइपरायटर कंपनीने तयार केली आहे. फ्लेक्झोरायटर नावाचे स्वंयचलित यंत्र लष्करासाठी दुसऱ्या महायुद्धात तयार करण्यात आले. सध्या त्याचा उपयोग इतर क्षेत्रांतही करण्यात येतो. १९३५ मध्ये फ्रँक कार्लसन यांनी छिद्रित फितीकरिता निर्वात तत्त्वाचा उपयोग करून ‘रोबो टायपर’ नावाचे स्वंयचलित यंत्र तयार केले. याच यंत्राने विजेवर चालणाऱ्या यंत्राच्या स्वरूपात रूपांतर करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्याचा वापर कमी झाला पण युद्धानंतर ते परत वापरात आले. १९६० मध्ये ‘रॉयल टायपर’ नावाचे स्वयंचलित यंत्र बाजारात आले. या यंत्रावर एक माणूस १२५ पर्यंत पत्रे टंकलिखित करू शकतो. तसेच एकाच वेळी चार यंत्रे चालवून ५०० पर्यंत पत्रे तयार करू शकतो.

अन्य क्षेत्रांतील उपयोग : नेहमीच्या कार्यालयीन कामकाजाखेरीज अन्य क्षेत्रांतही टंकलेखन यंत्राचा व त्याच्या तत्त्वावरच आधारलेल्या इतर यंत्रांचा उपयोग करण्यात येतो. गणितीय कृत्ये करणारी, जमाखर्च करणारी व तो टंकलिखित स्वरूपात देणारी इ. प्रकारची यंत्रे टंकलेखन यंत्राच्या तत्त्वावरच तयार करण्यात आली. अशा यंत्रांच्या शोधामुळे टंकलेखन यंत्राची व ⇨संगणकाची (काँप्यूटरची) सागंड घालणे शक्य झाले. ‘पेपर टेप पंच अँड रीडर’ हे या पद्धतीचे एक यंत्र होय. हे यंत्र विशिष्ट प्रकारच्या सुधारलेल्या टंकलेखन यंत्राला जोडलेले असते. यामुळे टंकलेखनावर नियंत्रण ठेवता येते किंवा टंकलेखन यंत्राच्या नियंत्रणामुळे या यंत्रातून छिद्रित फीत मिळते. विद्युत् टंकलेखन यंत्राच्या तत्त्वावर आधारलेली टेलेक्स दूरमुद्रक (टेलिप्रिंटर) इ. यंत्रे सध्या वापरात आहेत.

अक्षरांचे खिळे जुळविण्याच्या वेळखाऊ व खर्चिक कामामुळे मुद्रणाला वेळ लागतो. विशिष्ट प्रकारची टंकलेखन यंत्रे वापरून तयार करण्यात आलेल्या यंत्रांचा (उदा., मोनोटाइप, लायनोटाइप इ.) वापर करून हा वेळ पुष्कळच कमी करता येतो, असे आढळून आले आहे. १९५० सालानंतर अशा यंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे [⟶ मुद्रण].

एका प्रतीवरून सुधारित प्रत तयार करणे, एकसारख्या लांबीच्या ओळी तयार करणे, शुद्ध टंकलिखित प्रत तयार करणे इ. स्वरूपाची कामे करणारे व त्याकरिता विशिष्ट साधने जोडलेले टंकलेखन यंत्रही तयार करण्यात आलेले आहे.


विविध लिप्यांतील टंकलेखन यंत्रे : वरील सर्व वर्णन रोमन लिपितील टंकलेखन यंत्रांसंबंधीचे असून या यंत्रांचीच सर्व जगात सर्वाधिक निर्मिती करण्यात येते. तथापि काही देशांत प्रादेशिक आवश्यकतेनुसार विविध लिप्यांतील टंकलेखन यंत्रे तयार करण्यात आली आहेत.

देवनागरी टंकलेखन यंत्रे नक्की कोणत्या वेळेपासून प्रचारात आली, हे सांगणे कठीण आहे. १९३२ च्या सुमारास एका जर्मन कंपनीने एक देवनागरी टंकलेखन यंत्र पुणे येथील अनाथ विद्यार्थी गृहाचे शं. रा. दाते यांच्या व्यक्तिगत मागणीवरून तयार केले होते. तथापि या यंत्राचा पारतंत्र्याच्या काळात फारसा प्रसार झाला नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेतील वुडस्टॉक कंपनीने १९४८ साली लखनौच्या एका गृहस्थाच्या मागणीवरून देवनागरी लिपीतील यंत्रे मोठ्या प्रमाणावर पाठविली होती. परंतु याही यंत्रांना फारशी मागणी न मिळाल्याने बहुतेक यंत्रे परत रोमन लिपीत रूपांतरित केली गेली. ऑलिंपिया या जर्मन कंपनीने १९५०–५१ च्या सुमारास काही देवनागरी यंत्रे बाजारात आणली होती. रेमिंग्टन कंपनीनेही याच सुमारास देवनागरी यंत्रे तयार करण्यास सुरुवात केली. गोदरेज कंपनीने १९६२ साली केंद्र सरकार पुरस्कृत देवनागरी टंकलेखन यंत्राची नमुना आवृत्ती पूर्व जर्मनीतील ऑप्टिमा कंपनीच्या सहकार्यने तयार केली व मोठ्या प्रमाणावर उत्पादन १९६८-६९ साली केले. तरी पण भारतात एकंदरीत मागणीचे प्रमाण फारच कमी राहिले. १९७५ सालापासून मात्र केंद्र सरकारने सर्व कार्यालयांना देवनागरी टंकलेखन यंत्रे ठेवण्याची सक्ती केल्याने मागणीचा जोर वाढला.

देवनागरी यंत्रांमध्ये अक्षरांना जोडण्यात येणारी अनुस्वार, उकार, मात्रा इ. चिन्हे छापल्यावर वाहक-रूळ पुढे जात नाही. ही चिन्हे अगोदर छापून मग त्यांच्याशी संबंधित अक्षरे छापतात व मग नेहमीप्रमाणे रूळ पुढे सरकतो. या अडचणीमुळे देवनागरी लिपीत टंकलेखन करण्याचा वेग रोमन लिपीच्या मानाने पुष्कळच कमी पडतो.

भारतातील तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती, बंगाली, गुरुमुखी इ. लिप्यांतील टंकलेखन यंत्रे उपलब्ध आहेत. बहुतेक राज्य सरकारांनी प्रमाणित मुद्राफलक तयार केलेले असल्यामुळे यंत्राचे उत्पादन करणे सोयीचे झाले आहे. पूर्वी प्रत्येक कंपनीचा वेगवेगळा मुद्राफलक असे व त्यामुळे एका कंपनीच्या यंत्रावर काम करणाऱ्या टंकलेखकाला दुसऱ्या कंपनीच्या यंत्रावर काम करणे अवघड होत असे.

रसायनशास्त्र, गणित, भौतिकी इ. विषयांत वारंवार येणारी चिन्हे, घातचिन्हे, पादचिन्हे, रासायनिक चिन्हे इत्यादींसह अशा विषयांतील मजकूर टंकलिखित करता येईल, अशी यंत्रेही तयार करण्यात आलेली आहेत.

अंधांसाठी टंकलेखन यंत्रे : अठराव्या शतकाच्या अखेरीस आणि एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला अंध माणसांना वापरण्यास योग्य असे टंकलेखन यंत्र तयार करण्याचे प्रयत्न झाले. उठाव असलेली अक्षरे छापणारे एक यंत्र १८५६ मध्ये ए. ई. बीच यांनी तयार केले. पण त्यावर टंकलेखन फार मंद गतीने होई व त्यात अरुंद कागदी फितीवर छपाई होत असल्यामुळे ते प्रायोगिक अवस्थेतच राहिले. १८३४ मध्ये ब्रेल लिपीमध्ये सुधारणा झाल्यानंतर तिच्यावर आधारलेली टंकलेखन यंत्रे तयार करण्याचे प्रयत्न झाले. १८६२ मध्ये तयार करण्यात आलेले मार्टिन टंकलेखन यंत्र ब्रेल लिपीवरच आधारले होते. ही यंत्रे सर्वसामान्य यंत्रांपेक्षा वेगळी होती. १९५० च्या मॅट्रिक्स मॉडेल एफ १२२१ या यंत्रात फक्त सात बटणे असून सहा टिंबांत बसविलेली ब्रेल लिपी त्यावर टंकलिखित करता येते. १९७२ मध्ये अमेरिकेत पर्किन्स ब्रेलर नावाचे यंत्र तयार करण्यात आले. हे यंत्र मॅट्रिक्स मॉडेलचीच आधुनिक आवृत्ती आहे. याखेरीज बहुतेक कंपन्यानी सर्वसामान्य यंत्रांत थोडाफार बदल करून म्हणजे मधल्या चार बटणांवर अंधांना समजतील असे उंचवटे ठेवून नेहमीच्या पद्धतीने टंकलेखन करण्याची सोय केलेली आहे. या यंत्रावरची मापकपट्टी मात्र ब्रेल लिपीची असते व अंधांना त्यानुसार कागदाची किनार समजू शकते. जपानमधील शिंजिरो मात्सुई यांनी एकाच वेळी सर्वसाधारण यंत्राप्रमाणे टंकलिखित मजकूर व ब्रेल लिपीतील तोच मजकूर टंकलिखित करू शकणारे यंत्र तयार केले आहे. यामुळे अशा यंत्राने टंकलिखित केलेला मजकूर ब्रेल लिपी जाणणारा अंध माणूस वाचू शकेल. भारतात अंधांसाठी ब्रेल पद्धतीची यंत्रे अद्याप तयार करण्यात आलेली नाहीत.

उपयुक्तता : सर्व प्रकारच्या आधुनिक कचेऱ्यांमध्ये टंकलेखकाला व टंकलेखन यंत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. टंकलेखन यंत्रामुळे श्रम व वेळ यांची बचत होऊन प्रचंड प्रमाणावर कागदोपत्री काम होऊ शकते. टंकलेखन यंत्रांमुळे स्त्रियांना व्यावसायिक क्षेत्रात महत्त्वाच्या कामगिरीच्या जागा मिळणे सुलभ झाले. टंकलेखन यंत्राच्या वाढत्या उपयुक्ततेमुळे टंकलेखन शाळा, व्यावसायिक महाविद्यालये, धंदेशिक्षण शाळा इ. शैक्षणिक संस्थांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. काही देशांत अगदी प्राथमिक इयत्तांमध्ये टंकलेखन यंत्रे व त्यांपासून मिळणारे फायदे यांची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात येते.


रचना : आधुनिक टंकलेखन यंत्राचे लहान मोठे मिळून शेकडो भाग असतात. तथापि त्यांची कार्यपद्धती सापेक्षतः सोपी असून तिचे प्रमाणीकरण करण्यात आलेले आहे. त्यानुसार सर्व कारखानदार यंत्रे तयार करतात. प्रमाणित टंकलेखन यंत्राची सर्वसाधारण रचना आ. २ मध्ये दाखविली आहे.

यंत्राच्या  वरच्या भागात एक वाहक-रूळ असतो. त्याच्यामुळे कागद छापण्याच्या बिंदूच्या दृष्टीने क्षितिज समांतर सरकतो. या रूळावर बसविलेला कागद घट्ट धरून ठेवण्यासाठी दोन छोटे रबरी रूळ आडव्या सळईवर बसविलेले असतात. एक ओळ छापल्यावर कागद वर सरकवितात. इंग्रजी टंकलेखन यंत्रात प्रत्येक टंक तुकड्यावर दोन चिन्हे, लहान व मोठे अक्षर वा आकडे, विराम चिन्हे असतात. बटण दाबताच एकच अक्षर वा चिन्ह छापले जाते.

हस्तचलित यंत्रात बोटाने बटण दाबताच तरफा व जोडसळ्या यांच्याद्वारे अक्षर छापले जाते. अक्षरे उमटविण्यासाठी कागद व टंक यांमध्ये कार्बन फीत असते.

आ. २. प्रमाणित टंकलेखन यंत्र : (१) अंतर सोडण्याची पट्टी, (२) अक्षर-बदल (लहान-मोठे) बटण, (३) अक्षर-बदल बटणाची अटक, (४) रूळ मागे सरकविण्याचे बटण, (५) गुंतलेले टंक सोडविण्याची तरफ, (६) कोष्टकातील स्तंभांमधील अंतराचे बटण, (७) बटणावरील जोराचा नियामक, (८) कोष्टकातील दुसऱ्या स्तंभापाशी रूळ नेणारे बटण, (९) ओळीतील अंतराची व रूळ मागे सरकविण्याची तरफ, (१०) पत्र्याचे झाकण, (११) रूळ सुटा करण्याची तरफ, (१२) रूळाच्या मुठी, (१३) ओळींतील अंतर संयोजक, (१४) ओळींतील अंतर नियामक, (१५) वाहक सुटा करण्याची तरफ, (१६) स्वयंचलित ओळ शोधक (ओळींतील अंतराचा नियामक अकार्यकारी करणारा भाग), (१७) निरनिराळ्या रुंदीच्या कागदांसाठी संयोजक, (१८) कागदाचा मध्य दर्शविणारी अंकन पट्टी, (१९) पुनर्मार्गणक पट्टी (टंकलेखन होत असलेला कागद काढल्यास तो पुन्हा योग्य रीतीने बसविण्यासाठी मार्गणक पट्टी), (२०) छोटी कार्डे धरणारी पट्टी, (२१) टंकाचे स्थान निश्चित करणारा मार्गणक, (२२) आधाररूळ, (२३) कागद दाबून धरणारी सळई (हिच्यावर १८ मधील अंकनाशी जुळणारे अंकन असतो), (२४) कागद सैल करणारी तरफ, (२५) वाहक मोजपट्टी (वाहकाबरोबर चालते व टंक मार्गणकाच्या मध्यभागीच्या भोकामुळे अक्षराचे नेमके स्थान दर्शविते), (२६) शाईची फीत उलटविणारी कळ, (२७) उपयोगात असलेला फितींचा (वरचा, मधला वा खालचा) भाग दर्शक, (२८) कोष्टकातील स्तंभांची निश्चिती करणारे बटण, (२९) समास अटक मोकळी करणारी कळ.

सामान्यतः प्रमाणित टंकलेखन यंत्रात ४२–४६ बटणे असून ८४–९२ चिन्हे असतात. आवश्यक चिन्ह छापावयासाठी विशिष्ट बटणच वापरावे लागते. त्याशिवाय यंत्राला विविध प्रकारची बटणे असतात. (आ. २). त्यामुळे शब्दांमध्ये योग्य तितकेच अंतर राहते व वाहकरुळाची आवश्यक ती हालचाल होते. 

बटण दाबल्यावर कोणतेही अक्षर छापेपर्यंत होणाऱ्या हालचाली पुढीलप्रमाणे होतात (आ. ३). (१) या बटण-तरफेच्या दर्शनी टोकाला बटण असते व तिच्या मागील टोकाला (२) ही टेकू-खीळ असते. (२) जवळ एक गाळा असून त्यात (३) या कडीचे एक टोक (४) या खिळीने गुंतविलेले असते. (६) या टंक-तरफेच्या पुढच्या टोकावर चिन्ह असून ती तरफ (७) या टेकू-खिळेभोवती फिरते. या तरफेला एक शेपूट असून त्याला आकड्याचा आकार असते. या आकड्यात

आ. ३. पुढून अक्षर छापण्याच्या पद्धतीची व्यवस्था

(३) या कडीचे वरचे टोक (५) या खिळीने गुंतविलेले असते. (१) या बटण-तरफेवरील बटण दाबले की, ती (२) या खिळीभोवती फिरून (४) खिळीमुळे (३) या कडीला खाली ओढते. (३) ची ही गती टंक-तरफेच्या शेपटाला मिळून ती (७) या खिळीभोवती झटकन फिरते. शेपटाच्या चलनाचा वेग जरी थोडा असला, तरी टंक टोकाकडील तरफेची भुजा किती तरी पट मोठी असते व त्यामुळे टंकाचा वेग त्या प्रमाणात वाढतो व तो (८) या रुळावरच्या कागदावर आपटतो. अशा तऱ्हेने कागदावर चिन्ह उमटते. बटण-तरफ पुन्हा चटकन मूळ स्थानावर जावी म्हणून तिच्या मागील टोकावर दाब देणारी (९) ही तरफ योजलेली आहे. (१०) या स्प्रिंगमुळे (१) ही तरफ कायम उचलून धरून ठेवली जाते. ती जास्त वर जाऊ नये म्हणून (११) हा अटकाव असतो.

आ. ४. विद्युत् टंकलेखन यंत्रास अक्षर छापताना होणाऱ्या क्रिया

विद्युत् टंकलेखन यंत्रात बटण दाबल्यावर अक्षर (चिन्ह) छापले जाईपर्यंत होणाऱ्या क्रिया पुढीलप्रमाणे होतात (आ. ४). विद्युत् टंकलेखन यंत्र हे मूलत: हस्तचलित यंत्रासारखेच असते. पण यात टंक उचलून त्यावरील चिन्ह कागदावर छापण्याची क्रिया तेवढी विजेच्या शक्तीने केली जाते. या यंत्रात कोणतीही क्रिया (उदा., चिन्ह उमटविणे, अक्षर लहान-मोठे निवडणे, वाहक-रूळ सरकवणे इ.) करण्यासाठी असलेले (१) हे बटण-तरफेचे बटण दाबावे लागते, पण त्याकरिता नेहमीच्या इतका जोर लावावा लागत नाही. बटण दाबल्यामुळे (२) ही ⇨ कॅम-तरफ  (३) या टेकू-खिळी भोवती फिरते व तिचे (कॅम-तरफेचे) शेपूट (२ अ) हे (९) या विद्युत् चलित्राने (मोटरने) कायम गतीने फिरणाऱ्या (४) या रुळाच्या संपर्कात येते. रूळ व शेपूट यांच्यातील घर्षणामुळे कॅम-तरफ बाणाने दाखविलेल्या दिशेने फिरत जाते. ती फिरताना तिला जोडलेल्या (५) या कडीने (६) या टंक-तरफेचे टोक बाणने दाखविलेल्या दिशेने ओढले जाते. टंक-तरफ (७) या टेकू-खिळीभोवती फिरून तिच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या टंकावरील चिन्ह (८) हे कागदावर आपटते व त्यावर उमटते. ही क्रिया निमिषार्धात व्हावी यासाठी या तरफ शृंखलेत काही स्प्रिंगांची योजना केलेली असते. चिन्ह आपटले की, कॅममुळे शेपटीसकट कॅम-तरफ आपल्या मूळ जागेवर येते. या यंत्रामुळे सर्व चिन्हांवर सारखाच जोर पडून छपाई एकसारखी होते. या यंत्रावर काम करताना टंकलेखकाच्या शक्तीचा फारसा व्यय होत नसल्यामुळे तो न दमता जलद टंकलेखन करू शकतो.


टंकलेखन क्रिया : जलद व सुवाच्च टंकलेखन करण्याच्या दृष्टीने कोणत्या बोटांनी मुद्राफलकातील कोणती बटणे दाबावीत यासंबंधी अभ्यास करून एक विशिष्ट पद्धती बसविण्यात आली आहे. या पद्धतीने टंकलेखन करण्याचा चांगला सराव झाला, तर टंकलेखकाला केवळ मजकुरावर लक्ष व दृष्टी केंद्रित करून मुद्राफलकाकडे न बघता टंकलेखन करणे सहज शक्य होते. या पद्धतीला ‘स्पर्श पद्धत’ म्हणतात. चांगल्या टंकलेखकाला ही पद्धती आत्मसात झालेली असणे अत्यावश्यक असते. टंकलेखनाचा वेग टिकविण्यासाठी टंकलेखकाला सातत्याने टंकलेखन करण्याची सवय ठेवावी लागते.

भारतीय उद्योग : १९३० सालापर्यंत तयार टंकलेखन यंत्रे भारतात आयात करण्यात येत होती. त्यानंतर सुटे भाग परदेशातून मागवून व ते जोडून यंत्रे तयार करण्यात येऊ लागली. १९४२ च्या सुमारास गोदरेज कंपनीने टंकलेखन यंत्रे तयार करण्याची योजना आखली होती परंतु युद्धजन्य परिस्थितीमुळे ती अंमलात येऊ शकली नाही. १९५० नंतर मात्र या कंपनीने झपाट्याने हे काम हाती घेऊन १९५४-५५ मध्ये कोणत्याही परकीय सहकार्याविना भारतीय तंत्रज्ञांनी बनविलेले टंकलेखन यंत्र बाजारात आणले. गोदरेज कंपनीच्या संपूर्ण भारतीय उत्पादनामुळे व सरकारच्या आयात धोरणामुळे शेवटी रेमिंग्टन व हाल्डा या कंपन्यांनाही संपूर्णपणे भारतातच टंकलेखन यंत्रे बनविणे भाग पडले. सध्याही याच तीन प्रमुख कंपन्या भारतात टंकलेखन यंत्रे मोठ्या प्रमाणावर तयार करीत आहेत. गोदरेज कंपनीने १९७६ साली तयार केलेले टंकलेखन यंत्र आ. ५ मध्ये दाखविले आहे. मद्रास येथील सरकारी मालकीच्या कारखान्यात मुख्यतः दूरमुद्रक यंत्रे बनविली जातात. अलीकडेच या कारखान्याने विद्युत् टंकलेखन यंत्रांचेही उत्पादन सुरू केले आहे.

आ. ५. गोदरेज कंपनीच्या टंकलेखन यंत्राचे AB मॉडेल (१९७६)

दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या (१९५६–६०) सुरुवातीच्या काळात टंकलेखन यंत्रे तयार करणाऱ्या तीन कारखान्यांची उत्पादनक्षमता प्रती वर्षी ३३,००० यंत्रे इतकी होती. १९६२ मध्ये चार कारखाने उत्पादन करीत होते व त्यांची उत्पादन क्षमता ४५,००० यंत्रे इतकी होती. प्रत्याक्षात मात्र त्या वर्षी ३७,०४४ यंत्रेच तयार केली गेली. १९७४ अखेर कारखान्यांची संख्या तीन होती व आणखी चार कारखान्यांना परवानगी देण्यात आली. मुंबई, कलकत्ता, दिल्ली व मद्रास येथे टंकलेखन यंत्रांचे कारखाने आहेत. भारताची सध्याची वार्षिक गरज ९०,००० यंत्रांची आहे. भारतात रोमन, देवनागरी व इतर भारतीय लिप्यांतील टंकलेखन यंत्रे तयार करण्यात येतात. यांत प्रमाणित, सुबाह्य व विद्युत् अशा तीन प्रकारची यंत्रे तयार होतात.

सध्याच्या सरकारी संरक्षक धोरणानुसार परदेशी टंकलेखन यंत्रे आयात करण्यावर बंदी आहे. फक्त निर्यातदार कंपन्यांना स्वतःच्या वापरासाठी खास परवान्यावर विद्युत् टंकलेखन यंत्रे आयात करता येतात. भारतातून थोड्या प्रमाणावर टंकलेखन यंत्रांची निर्यात होते. १९६२ साली ४,६९,५०० रु, १९६४ मध्ये ५,१४,००० रु. १९६८-६९ मध्ये ५,३८,००० रु. १९७०-७१ मध्ये ९,४०,००० रु. आणि १९७४ मध्ये ८,००,००० रु. इतक्या किंमतीची यंत्रे निर्यात झाली. भारतातून मलेशिया, दक्षिण कोरिया, फिलिपीन्स, मध्य पूर्वेतील देश, नेपाळ, बांगला देश इ. देशांना टंकलेखन यंत्रे निर्यात केली जातात.

संदर्भ :

1. Biliven, B. (Jr.) The Wonderful Writing Machine, New York, 1954.

2. Current, R. N. The Typewriter and the Men Who Made It, Urbana (llinois), 1954.

3. Richards, G. T. The History and Development of Typewriters, London, 1964.

गुप्ते, का. भा.