झूलूलँड : दक्षिण आफ्रिका प्रजासत्तकाच्या नाताळ प्रांताचा ईशान्येकडील विभाग. क्षेत्रफळ ३१,४४० चौ. किमी. (१९७१). लोकसंख्या २१,०६,००० (१९७०). हा प्रदेश २९ प्रमुख अलग वस्त्यांत विभागलेला असून त्यात झूलू लोक राहतात.

क्राल : झूलूंच्या वैशिष्ट्यपूर्ण झोपड्या

या प्रदेशाचा एकोणिसाव्या शतकातील इतिहास म्हणजे झूलूंची आपापसातील यादवी युद्धे व गोऱ्या आक्रमकांशी झगडे हा होय. बोअर लोक समुद्राकडे जाण्याचा मार्ग घेण्याच्या प्रयत्नात असता चाकॅ (शाकॅ) हा झूलू नेता त्यांना आडवा आला. त्याच्यानंतर आक्रमकांशी झगडणाऱ्या नेत्यांत शाकॅचा भाऊ व खुनी डिंग्गान आणि पुतण्या सेटीवेओ होते. १८७७ साली ब्रिटिशांनी ट्रान्सव्हाल घेतला आणि १८७९ मध्ये झूलूलँडवर आक्रमण केले. प्रथमतः सेटीवेओने त्यांना मार दिला पण घरगुती यादवीने तो राज्यभ्रष्ट झाला आणि १८८७ मध्ये ब्रिटिशांनी हा प्रदेश घेतला. त्यांनी त्याचे तुकडे करून मुखियांत वाटून दिले व शेवटी १८९७ मध्ये झूलूलँड प्रदेश नाताळात विसर्जित करण्यात आला परंतु १९०६–७ मध्ये झूलूंनी पुन्हा उठाव केला. अखेर त्यांना राखीव प्रदेश देऊन आपल्या प्रघाताप्रमाणे समाजनियंत्रण करण्याची मुभा दिली गेली. लोककल्याण व सामान्य नीतिनियम यांना बाधक नसलेले झूलूंचे पारंपरिक कायदेही मान्य करण्यात आले. त्यांचे अंतर्गत स्वातंत्र्य अद्याप अबाधित आहे. १९७२ मध्ये त्यांची विधानसभा स्थापन झाली असून ऊलूंडी येथे राजधानी आहे.

झूलू लोक बांटू भाषिक आहेत. उंची, शरीरसौष्ठव आणि लढाऊ वृत्ती यांबद्दल झूलू विख्यात आहेत. यांचा पशुपालन हा व्यवसाय असून बाजरी, नाचणीसारखी धान्ये व मांस हा त्यांचा मुख्य आहार आहे. सामायिक कोंडवाड्याभोवती मधाच्या पोळ्याप्रमाणे झोपड्या बांधून हे राहतात यास ‘क्राल’ महणतात. प्रत्येक क्रालचा एक मुखिया असतो. झूलूंमध्ये बहुपत्नीकत्वाची प्रथा असून पशुधनाच्या स्वरूपात वधूमूल्य (लोबोला) देण्याचा प्रघात आहे.

झूलूलँड

आधुनिक काळात या प्रदेशात ऊस व कापूस यांची लागवड झाली आहे आणि काही जलसिंचन प्रकल्प कार्यान्वित आहेत. याच्या दक्षिण भागात कोळशाचे साठे आहेत असा अंदाज आहे. तथापि निकृष्ट जमीन व शहरांचे आकर्षण यांमुळे धट्ट्याकट्ट्यांचा ओढा राखीव प्रदेशाबाहेर आहे आणि एका काळचे हे शूर लोक खाण वा गोदी कामगार, मजुरी, हमाली, रिक्शा इ. व्यवसांयात आढळतात. पोलीस व सरंक्षण दलातही झूलूंचा उपयोग केला जातो.

संदर्भ : Fitzgerald, Walter, Africa : A Social, Economic and Political Geography of Its Major Regions, London, 1961.

शहाणे, मो. ज्ञा.