झील्येराँ, झ्यूल : (२१ डिसेंबर १८५४–२६ एप्रिल १९२६). फ्रेंच भाषाशास्त्रज्ञ. फ्रेंच भाषेचा भूगोल आणि फ्रेंच भाषेची स्थानिक वैशिष्ट्ये दाखविणारे नकाशे तयार करणारा अभ्यासक. नव्हव्हिल, स्वित्झर्लंड येथे जन्म. बाझेल व पॅरिस येथे त्याचे शिक्षण झाले. ‘Ecole des Hautes Etudes’ येथे पदविका घेतली (१८७९) व त्याच संस्थेत १८८३ पासून अखेरपर्यंत फ्रेंच बोलीभाषांचे अध्यापन केले. १८८०–८१ मध्ये त्याने दोन स्थानिक बोलींचा अभ्यास करणाऱ्या पुस्तिका प्रसिद्ध केल्या. त्यांवरून त्याला भाषिक भूगोलाची कल्पना सुचली. एदमाँ एदमाँ या सहकाऱ्याच्या मदतीने त्याने या कामाला सुरुवात केली. फ्रान्समधील सर्व गावांचे नमुने गोळा करणे अशक्य असल्यामुळे, ६३९ वेगवेगळी भाषिक ठिकाणे नक्की करून तिथले भाषिक नमुने त्यांनी ऑगस्ट १८९७ ते डिसेंबर १९०१ या काळात गोळा केले. प्रमाण फ्रेंचमधील १,९०० शब्द व १०० वाक्ये घेऊन उच्चारदृष्ट्या, व्याकरणदृष्ट्या व अभिव्यक्तिदृष्ट्या त्यांचे स्वरूप कसे बदलते, हे दाखविणारे नकाशे त्याने तयार केले. या अभ्यासातून पोटभाषांचा अभ्यास, शब्दांची व्युत्पत्ती, एकच अर्थ व्यक्त करणाऱ्या भिन्नभिन्न शब्दांची वाटणी इत्यादींच्या संबंधात उपयुक्त माहिती मिळून काही नवे सिद्धांत मांडता आले. एकाच शब्दाची भिन्नभिन्न स्थानिक रूपे त्याच्या व्युत्पत्तीलाही मदतरूप होतात, हे त्याने दाखवून दिले. बर्न राज्यातील शेर्नेल्‌त्स येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : 1. Meillet, Antoine, Linguistique historique et linguistique generale, Parts I, II, Paris, 1926, 1938.

           २. कालेलकर, ना. गो. भाषा : इतिहास आणि भूगोल, मुंबई, १९६४.

 कालेलकर, ना. गो.