झीनो, ईलीआचा : (इ. स. पू. ४९० ― ?). एक ग्रीक तत्त्ववेत्ता. प्लेटोच्या पार्मेनिडीझ ह्या ग्रंथातील काही विधानांवरून तो इ. स. पू. ४९० च्या सुमारास जन्मला असावा, असा तर्क करता येतो. यांशिवाय झीनोविषयी उपलब्ध असलेली निश्चित माहिती एवढीच, की तो ईलीआचा नागरिक होता, त्याचा पार्मेनिडीझशी चांगला परिचय होता व तो त्याचा अनुयायीही होता. त्याने एकच ग्रंथ प्रसिद्ध केला होता आणि त्याच्यात आपले प्रसिद्ध विरोधाभास मांडले होते.
आपण व्यवहारात असे मानतो, की ह्या जगात अनेक वस्तू आहेत. ह्या वस्तू बदलतात, स्थित्यंतर पावतात अथवा स्थानांतर करतात आणि इंद्रियसंवेदनांनी आपल्याला त्यांचे ज्ञान होते. ह्याच्या उलट, पार्मेनिडीझने असे प्रतिपादन केले होते, की नाना वस्तूंचे बनलेले हे जग आभासात्मक असून वस्तुतः पाहता एकमेव असे सत् आहे आणि ते स्थिर आणि अचल आहे. आपल्या नेहमीच्या अनुभवाच्या विरोधी असणाऱ्या पार्मेनिडीझच्या मताचे समर्थन करण्यासाठी आणि आपला नेहमीचा अनुभव आत्मविसंगत व म्हणून त्याज्य आहे हे दाखवून देण्यासाठी, झीनोने ह्या विरोधाभासांची रचना केली. त्यांचे पुढील चार प्रकार पाडता येतील : (१) अनेकतेचे खंडन करणारे (२) गतीचे खंडन करणारे (३) वस्तूचे ‘स्थान’ ह्या संकल्पनेचे खंडन करणारे व (४) इंद्रियसंवेदन अप्रमाण असते हे दाखवून देऊ पाहणारा ‘धान्याच्या ढिगा’चा विरोधाभास.
अनेकतेचे खंडन करणारा एक युक्तिवाद थोडक्यात असा मांडता येईल : जर अनेक असतील, तर त्यांतील प्रत्येक एक असला पाहिजे. जो एक आहे त्याला आकारमान असणारा नाही कारण त्याला आकारमान असेल तर त्याचे भाग असतील, म्हणजे तो एक नसून अनेक आहे असे होईल. तेव्हा कोणत्याच एकाला आकारमान असणार नाही पण मग असे एक एकत्रित केल्याने आकारमान असलेली वस्तूही निष्पन्न होणार नाही. पण आकारमान असलेल्या वस्तू आहेत. तेव्हा ज्या एकांच्या त्या बनलेल्या असतील त्यांना आकारमान असणार. म्हणजे असा एक घेतला, तर (त्याला आकारमान असल्यामुळे) त्याचे भाग असणार आणि त्यांना आकारमान असल्यामुळे त्यांचे भाग असणार व ह्या भागांना आकारमान असणार. म्हणजे ह्या एकाचे अनंत भाग असणार व ह्या प्रत्येक भागाला आकारमान असल्यामुळे ह्या एकाचे आकारमान अनंत असणार. तेव्हा अनेक असले तर त्यांपैकी प्रत्येक एक असा असणार, की त्याला आकारमान असणार नाही आणि त्याचे आकारमान अनंत असणार, ही दोन्ही विधाने त्याच्याविषयी सत्य ठरतील.
झीनोच्या विरोधाभासांमुळे ‘अनंत’, ‘संख्या’ इ. संकल्पनांतील तार्किक अडचणींकडे गणितज्ञांचे लक्ष वेधले गेले व ग्रीक गणिताच्या विकासाला चालना मिळाली. ग्रीक परमाणुवादावरही झीनोच्या युक्तिवादांचा प्रभाव पडला पण त्याहीपेक्षा संकल्पनांचे विश्लेषण व खंडन करण्याच्या तत्त्वज्ञानातील द्वंद्वीय रीतीचा नमुना त्याने घालून दिला. प्लेटो, कांट, हेगेल इ. श्रेष्ठ तत्त्ववेत्त्यांनी ह्या रीतीचे अनुसरण केले आहे. [⟶ ग्रीक तत्त्वज्ञान].
रेगे, मे. पुं.
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..