झीद, आंद्रे : (२२ नोव्हेंबर १८६९–१९ फेब्रुवारी १९५१). चतुरस्र फ्रेंच साहित्यिक. जन्म पॅरिसमध्ये सुस्थितीतील प्रॉटेस्टंट पंथीय कुटुंबात. शिक्षण पॅरिस येथे. प्रकृती नाजूक असल्यामुळे त्याच्या शिक्षणात सतत अडथळे येत असत. वडील पॉल झीद हे एक नामांकित वकील होते आई एका उद्योगपतीची मुलगी होती. आंद्रेचे वडील साहित्यप्रेमी होते. श्रेष्ठ साहित्याकृती वाचून दाखवून आंद्रेमध्येही त्यांनी साहित्याची आवड निर्माण केली. १८८० मध्ये ते निवर्तल्यानंतर आंद्रेचा प्रतिपाळ त्याच्या आईने आणि ॲना शॅकल्टन ह्या तिच्या एका मैत्रिणीने केला. झीदची आई सद्‌गुणी होती परंतु तिचा स्वभाव कडक आणि एककल्ली होता. आपल्या आईविषयी आंद्रेला आदर असला, तरी तिच्यामुळे त्याला काही मनस्तापही भोगावा लागला. आंद्रेने लेखक व्हावे, असे तिला वाटत नव्हते. तथापि तिच्या विरोधास न जुमानता साहित्यसेवेचा निर्णय त्याने घेतला. आईच्या मृत्यूनंतर तो बऱ्याच मोठ्या संपत्तीचा मालक झाला.

आंद्रे झीद

मादलॅन राँदो ह्या स्वतःच्या मामेबहिणीशी आंद्रेने १८९५ मध्ये विवाह केला. तथापि तो अयशस्वी ठरला. झीदची समलिंगी संभोगप्रवृत्ती हे ह्या अपयशाचे एक प्रमुख कारण होते. झीद पतिपत्नी एकमेकांपासून कधीच वेगळी झाली नाहीत. त्यांना परस्परांविषयी प्रेम आणि आदर वाटे. झीदच्या मनात संयम आणि सद्‌गुण ह्यांचे प्रतीक म्हणून तिचे स्थान होते. झीदचे वैवाहिक जीवन आणि त्याचे साहित्य ह्यांचे निकट नाते आहे.

प्येअर लुई ह्या झीदच्या मित्राने सुप्रसिद्ध फ्रेंच प्रतीकवादी कवी मालार्मे ह्याच्याशी झीदची ओळख करून दिली होती. झीदच्या आरंभीच्या साहित्यकृतींवर प्रतीकवादाचा प्रभाव दिसून येतो. ले काय्ये दांद्रे वाल्तॅर (१८९१, इं. शी. द नोटबुक्स ऑफ आंद्रे वाल्तॅर) आणि त्रेते द्यु नार्सिस (१८९१, इं. भा. नार्सिसस, १९५३) ह्या त्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय कृतींपैकी काही होत. ले काय्ये दांद्रे वाल्तॅर  हे दैनंदिनीवजा, आत्मचरित्रात्मक असे लेखन. पौगंडावस्थेतील अस्वस्थतेचे चित्रण त्यात आढळते. मनमोकळ्या कबुलीजबाबासारखे आत्मकथन हे झीदच्या एकूण साहित्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. त्याची सुरुवात ह्या लेखनात आढळते. सत्य आणि पूर्णत्व ह्यांचे आकलन केवळ प्रतीकांच्या माध्यमातूनच होऊ शकेल, असा विचार त्रेते द्यु नार्सिसमध्ये आलेला आहे. ला तांतातीव्ह आमुरझ (१८९३, इं. शी. द अटेंप्ट ॲट लव्ह) आणि ला व्हॉय्याज द्युरिया (१८९३, इं. भा. युरिअन्स व्हॉयेज, १९६४) ह्या त्याच्या दोन कथाही ह्याच काळातील.

झीदने उत्तर आफ्रिकेचा प्रवास १८९३ मध्ये केला. तेथील वास्तव्याचे त्याच्या मनावर सखोल संस्कार झाले. पुढेही उत्तर आफ्रिकेस त्याने अनेकवार भेटी दिल्या. १८९४ मध्ये तो तेथे असताना ऑस्कर वाइल्ड ह्या विख्यात अँग्लो-आयरिश साहित्यिकाशी त्याची भेट झाली. पारंपरिक नीतिसंकेत मोडण्याचे आवाहन वाइल्डने झीदला केले. स्वतःच्या समसंभोग प्रवृत्तीचे आकलन झीदला झाले. पॅरिसला परतल्यानंतर तेथील वाङ्‌मयीन वातावरणात त्याच्या मनाचा कोंडमारा होऊ लागला. झीदमधील हे परिवर्तन पाल्यूद (१८९५, इं. शी. मार्शलँड्स) ह्या उपरोधपूर्ण कथेत आणि ले नूरित्यूर तॅरॅस्त्र (१८९७, इं. भा. फ्रूट्स ऑफ द अर्थ, १९४९) ह्या गद्यकाव्यात स्पष्टपणे प्रत्यायास येते. पाल्यूद ही काळोख्या गुहांतून राहणाऱ्या प्राण्यांची कथा. दृष्टीचा वापर कधीच न केल्यामुळे ते आंधळे होतात. साहित्यातील सांकेतिकतेवर झीदने केलेली ही टीका होती. ले नूरित्यूर…मध्ये झीदने स्वैर जीवनाचा संदेश दिला. पहिल्या महायुद्धाच्या काळात झीदची एक प्रभावी साहित्यकृती म्हणून हे गद्यकाव्य मान्यता पावले. त्याचा काही भाग लिहून झालेला असतानाच झीदची आई मरण पावली (१८९५). त्या धक्क्याने तो ढासळल्यासारखा झाला. कडक आणि एककल्ली विधिनिषेधांचे प्रतीक असलेल्या आईच्या मृत्यूचा संस्कार त्याने त्यानंतर लिहावयास घेतलेल्या साऊल (१९०३) ह्या शोकात्मिकेतून प्रकटला. वासनांच्या आधीन झालेल्या साऊल राजाचे चित्र त्याने तीतून रंगविले. विरक्ती आणि इंद्रियासक्ती ह्यांच्यातील संघर्ष झीदच्या मनात सातत्याने चालू असे आणि त्याचे त्याच्या साहित्यात उमटणारे प्रतिसाद वैचारिक विसंगतीसारखे भासत. त्या दृष्टीने ल मॉरालिस्त (१९०२, इं. भा. द इमॉरॅलिस्ट, १९३०) आणि ला पोर्त एत्र्वात (१९०९, इं. भा. स्ट्रेट इज द गेट, १९२४) ह्या झीदच्या कादंबऱ्या विशेष उल्लेखनीय आहेत. ल मॉरालिस्तचा नायक मिशेल हा नीती गुंडाळून ठेवून फक्त इंद्रियसुखांच्या मागे लागतो. तर ला पोर्त …ची नायिका आलिसा पावित्र्यविषयक धार्मिक कल्पनांचा ऐकांतिक पाठपुरावा करून आपले मन व शरीर दडपत राहते. शरीरसुखाबद्दल उदासीन असलेल्या पत्नीबद्दल वाटणारे उत्कट प्रेम आणि विमुक्त जीवन जगण्याची इच्छा ह्या स्वतःच्या दोन प्रवृत्तींचा समन्वय घडवून आणण्यात झीद असमर्थ ठरला होता. त्याचे साद-पडसाद या दोन्ही कृतींत उमटले आहेत.

ले  काव्ह द्यु व्हातिकां (इं. भा. द व्हॅटिकन स्विंड्ल, १९२५) ही त्याची कादंबरी १९१४ मध्ये प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीचा घाट वरवर एखाद्या विनोदी बर्लेस्कसारखा असला, तरी तिच्यातून मांडलेला व्यक्तिस्वांतत्र्याचा प्रश्न लक्षणीय आहे. ह्या कादंबरीचा तरुण नायक लाफ्‌कादियो हा एक हेतुशून्य खून करतो. विशिष्ट व्यक्ती विशिष्ट प्रसंगी अमुक एका प्रकारचीच कृती करील, असे गृहीत धरण्यात त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा मूलाधार असे तिचे निर्णयस्वातंत्र्यच तिला नाकारले जात असते, अशी झीदची धारणा होती. अदीप (१९२०) ह्या शोकात्मिकेत व्यक्ती आणि धर्मसत्ता ह्यांच्या झगड्यातून त्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुनरुच्चार केला व १९२४ मध्ये प्लेटॉनिक संवादांच्या स्वरूपात प्रसिद्ध झालेल्या कॉरिदाँमध्ये समलिंगी संभोगाचा उघड पुरस्कार करून निसर्गसंकेतांपेक्षा व्यक्तिगत निवडीला प्राधान्य दिले.

झीदच्या लेखनाचे प्रस्थापित साहित्याप्रकारांनुसार काटेकोर वर्गीकरण करणे अवघडच आहे. तथापि १९२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ले फो मॉनॅय्यर (इं. भा. द काउंटरफिटर्स, १९२७) ह्या साहित्याकृतीचे त्याने आपली ‘एकुलती एक कादंबरी’ असे वर्णन केले आहे. ह्या कादंबरीची रचना बरीच गुंतागुंतीची असून विमुक्त व्यक्ती व कुटुंबसंस्था ह्यांच्यातील विरोध तिच्यातून परिणामकारकपणे मांडलेला आहे.

विसाव्या शतकाच्या आरंभी समीक्षक म्हणून झीदला मान्यता मिळू लागली होती. ला नुव्हॅल रव्ह्यू फ्रांसॅझ  ह्या प्रसिद्ध पुरोगामी वाङ्‌मयीन नियतकालिकाची स्थापना करण्यात त्याने पुढाकार घेतला (१९०८).  प्रेतॅक्‌स्‌त (१९०३, इं. शी. प्रिटेक्स्‌ट्‌स), नूव्हो प्रेतॅक्‌स्‌त्‌स (१९११, इं. शी. न्यू प्रिटेक्स्‌ट्‌स), डॉस्टॉव्हस्की (१९२३) आणि अँसिदांस (१९२४, इं. शी. इन्सिडन्सिस) हे त्याचे महत्त्वाचे समीक्षात्मक ग्रंथ. 


दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात झीदने केवल स्वांतत्र्यापेक्षा परंपरेच्या शिस्तीशी निगडित राहणारे स्वातंत्र्यच उपकारक होय, असा विचार मांडावयास सुरुवात केली. तेझे (१९४६, इं. शी. थिस्यूस) ही त्याची नाट्यकृती त्या दृष्टीने लक्षणीय आहे.

झीद आपला रोजनामा (जर्नल) १८८९ पासून सु. ६० वर्षे लिहीत होता. त्याच्या जीवनातील अनेक अनुभवांचे, समस्यांचे, संघर्षांचे प्रतिबिंब त्यात उमटलेले आहे. एवढा एक रोजनामा जरी त्याने लिहिला असता, तरी श्रेष्ठ साहित्यिकांत त्याची गणना झाली असती. जस्टीन ओ’ ब्रायन ह्यांनी ४ खंडांत त्याचा इंग्रजी अनुवाद केला आहे (द जर्नल्स ऑफ आंद्रे झीद, १९४७―५१). झीदचे अन्य लिखाणही विपुल आहे.

झीदच्या स्वातंत्र्यप्रेमातून त्याचा व्यापक, मानवतावादी दृष्टिकोण विकसित झाला. सामाजिक-राजकीय अन्यायाविरुद्ध त्याने तळमळीने लिहिले. फ्रेंच वसाहतवाद्यांच्या काँगोमधील धोरणावर त्याने टीका केली आफ्रिकनांच्या पिळवणुकीविरुद्ध आवाज उठवला गुन्हेगारांनाही माणुसकीने वागवावे, असे सांगितले. पहिल्या महायुद्धात त्याने रेड क्रॉससाठी काम केले स्पॅनिश यादवीच्या काळात निर्वासितांना मदत केली. काही काळ तो साम्यवादाकडे वळला होता परंतु रशियाला प्रत्यक्ष भेट देऊन आल्यानंतर त्याचा भ्रमनिरास झाला.

ऑक्सफर्ड विद्यापीठाने झीदला डॉक्टर ऑफ लेटर्स ही सन्मानपदवी १९४७ मध्ये दिली. त्याच वर्षी साहित्याचे नोबेल पारितोषिकही त्यास देण्यात आले, आधुनिक जागतिक साहित्यातील झीद ही एक शक्ती होती. अंतिम मूल्यांच्या सतत शोधनात असलेल्या झीदचे स्थान एक नीतिवादी म्हणून माँतेन, ला राशफूको आणि रूसो ह्यांच्या परंपरेत निश्चित झालेले आहे. पॅरिसमध्ये तो निधन पावला.

संदर्भ :

1. Bree, Germaine, Gide, New Brunswick, N. J., 1963.

2. Guerard, Albert, J. Andre Gide, Cambridge (Mass.), 1951.

3. Ireland, G. W. Gide, New York, 1963.

4. O’Brien, Justin, Portrait of Andre Gide, London, 1953.

सरदेसाय, मनोहरराय