झिनिया : फुलझाडांपैकी (आवृतबीज, द्विदलिकित) सूर्यफुल कुलातील [⟶ कंपॉझिटी] हा एक वंश असून त्यात एकूण वीस जाती अंतर्भूत आहेत व त्या बहुतेक ⇨ ओषधी व लहान झुडपे आहेत. त्या वर्षायू किंवा बहुवर्षायू ( एक वा अनेक वर्षे जगणाऱ्या) असून त्यांना आकर्षक फुले येत असल्याने शोभेकरिता सर्वत्र लावल्या जातात. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानाचा दक्षिण भाग ते चिली हा प्रदेश त्यांचे मूलस्थान आहे. झिनिया एलेगन्स (इं. यूथ अँड ओल्ड एज) ही वर्षायू जाती मेक्सिकोतील असून ती भारतातील बागांतून सामान्यपणे लावलेली आढळते. विविधरंगी फुलोरे [स्तबक, ⟶ पुष्पबंध] असलेले या जातीचे अनेक प्रकार जगात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर लागवडीत आहेत. झिनियाची सामान्य शारीरिक लक्षणे सूर्यफूल कुलात वर्णन केल्याप्रमाणे आहेत. झि. एलेगन्स सु. ०·३–१ मी. पर्यंत वाढणारी ओषधी असून तिचे खोड व फांद्या यांवर राठ केस असतात. पाने समोरासमोर, बिनदेठाची, खरबरीत, अंडाकृती व सु. २·५ सेंमी. रुंद असून सुंदर फुलोरे फांद्यांच्या टोकांस येतात. स्तबकातील किरण-पुष्पके व बिंब-पुष्पके यांचे रंग विविध हिरवा व निळा हे रंग नसतात. इतर झिनियात चायना ॲस्टरसारखा निळा व लाल रंगी प्रकार नसतात. स्तबकांचा व्यास भिन्न प्रकारांत २·५–१५ सेंमी. पर्यंत असतो. स्तबकांच्या घेरावरील किरण-पुष्पके स्त्रीलिंगी, जिव्हिकाकृती (सपाट जिभेसारखी) व एक ते चार मंडलांत असून स्तबकाच्या मध्यावर (बिंबावर) द्विलिंगी नलिकाकृती पुष्पके असतात. स्तबकाखाली तीन ते अनेक छदमंडले असून छदे गोलसर, विशालकोनी व रुंद आणि थोडीफार रंगीत असतात [⟶ फूल]. कृत्स्नफळे [न तडकणारी एकबीजी शुष्क फळे, ⟶ फळ] लहान, चपटी, सपक्ष आणि तपकिरी असतात. स्तबकांचा उपयोग हारतुरे इत्यादींकरिता करतात.
आफळे, पुष्पलता द.
झिनियाची वाढ पावसाळ्यात चांगली होते. झाडांना ऊब मानवते. सावलीत ती लांबटांगी होऊन फुले चांगली येत नाहीत. खोल, सुपीक व खतावलेली रेताड जमीन चांगली लागवड रोपे लावून करतात. रोपांकरिता मे-जूनमध्ये बी वाफ्यात पेरतात. रोपे तीन चार पानांची झाली म्हणजे उपटून कायमच्या जागी २५–४५ सेंमी. अंतरावर लावतात. लागवडीनंतर ५–६ आठवड्यांनी पहिली फूलकळी दिसताच शेंडा खुडल्यास पुष्कळ फांद्या फुटून फुले पुष्कळ येतात.
चौधरी, रा. मो.
झिनियावर भुरी, ठिपके व करपा हे कवकीय (हरितद्रव्यरहित बुरशीसारख्या सूक्ष्म वनस्पतींमुळे होणारे) रोग पडतात. त्यांचे निवारण अनुक्रमे गंधक भुकटी, बोर्डो मिश्रण आणि पारायुक्त कवकनाशक भुकटी यांचा वापर करून होते. व्हायरसजन्य (विषाणुजन्य) रोगामुळे पाने वळतात, अशी झाडे उपटून जाळणे, हा एकच उपाय आहे.
रुईकर, स. के.
“