झिंकाइट : खनिज, स्फटिक षट्‌कोणीय, विरळाच आढळतात. सामान्यतः संपुंजित, पर्णित वा कणमय राशी आढळतात. पाटन (1010) चांगले [⟶ स्फटिकविज्ञान]. भंजन किंचित शंखाभ. ठिसूळ. कठिनता ४–४·५. वि.गु. ५·६. चमक काहीशी हिऱ्यासारखी ते काचेसारखी. रंग गडद तांबडा वा नारिंगी पिवळा. रंग मँगॅनिजामुळे येत असावा. कस नारिंगी पिवळा. रा. सं. ZnO.  जस्ताच्या द्वितीयक (नंतर तयार झालेल्या) खनिजांच्या रूपांतरणाने झिंकाइट तयार होते. ते फ्रँकलिन (न्यू जर्सी, अमेरिका) येथे आढळते. जस्ताचे धातुक म्हणून व पांढरे जस्त (जस्ताचे ऑक्साइड) हे रंगद्रव्य तयार करण्यासाठी याचा उपयोग होतो. यालाच रेड ऑक्साइड ऑफ झिंक, रेड झिंक, स्पार्टालाइट वा स्टर्लिंगाइट अशीही नावे आहेत. 

केळकर, क. वा.