झॉमीनी, हांरी : (६ मार्च १७७९–२४ मार्च १८६९). स्विस सेनाधिकारी व युद्धशास्राचा लेखक. जन्म स्वित्झर्लंडमध्ये. हा १७९८ ते १८०४ या कालात स्विस सेनेत अधिकारपदावर होता. १८०५ साली मार्शल ने याने त्यास नेपोलियनच्या शिबीर साहाय्यकाची नोकरी दिली. पुढे १८०६ साली नेपोलियनने त्याला स्वतःच्या कर्मचारीसंघटनेत घेतले परंतु १८१३ साली कर्मचारीसंघटनेचा प्रमुख मार्शल बर्थियर याने अन्याय केल्यामुळे हा रशियन सैन्यात भरती झाला. तथापि त्याने रशियावरील नेपोलियनच्या आक्रमणात (१८१३) नेपोलियनविरुद्ध लढण्यास नकार दिला. तो १८६९ पर्यंत रशियन सैन्यात जनरलच्या हुद्यावर होता. याच काळात त्याने नेपोलियनच्या युद्धतंत्राचा अभ्यास करून फ्रेंच भाषेत बरेच ग्रंथ लिहिले.समरी ऑफ द आर्ट ऑफ वॉर  या आपल्या ग्रंथात त्याने युद्धकलेचे सिद्धांत मांडले आहेत. उदा., युद्धक्षेत्रातील ज्या परिसरात युद्धनिर्णय होणे शक्य आहे, त्याच परिसरात शत्रुबळावर आणि शक्य झाल्यास त्याच्या दळणवळणावर भारी दबाव आणावा तसेच जलद हालचाली करून व स्वसैन्याचा मोठा भाग संघटित करून शत्रूच्या लहान सैन्यभागाशी मुकाबला करावा, असा त्याचा सिद्धांत आहे. पॅरिसजवळ पासी गावी त्याचा मृत्यू झाला. ट्रिटाइज ऑन मिलिटरी ऑपरेशन्स  हा त्याचा दुसरा ग्रंथही उल्लेखनीय आहे.

दीक्षित, हे. वि.