झाव्हारी : द. अमेरिकेतील पेरू–ब्राझील सीमेवरून वाहणारी नदी. लांबी ८७० किमी. ही पेरू देशाच्या पूर्व सीमेवर ऊक्याली उंच प्रदेशात उगम पावून पेरू व ब्राझील यांच्या सीमेवरून वाहत जाऊन पेरू, ब्राझील व कोलंबिया यांच्या सीमा जेथे एकत्र येतात, तेथे ब्राझीलमधील बेंजामीन कॉन्स्टंट येथे ॲमेझॉन नदीला येऊन मिळते. ॲमेझॉनच्या दाट वर्षावनातून जात असल्यामुळे हिला वर्षभर भरपूर पाणी असते. ॲमेझॉन–झाव्हारी संगमापासून वर सु. ३०० किमी. हिच्यातून छोट्या आगबोटी जातात व छोट्या नावा वा वाफोर जवळजवळ थेट उगमापर्यंत जातात. हिला काही उपनद्याही येऊन मिळतात. हिच्या काठी लोकांनी वस्तीसाठी फार थोड्या ठिकाणी झाडे तोडून थोडीशी जागा तयार केली आहे.
यार्दी, ह. व्यं.