झारब्रुकेन : प. जर्मनीतील झारलँडची राजधानी. लोकसंख्या १,२७,९८९ (१९७०). स्ट्रॅसबर्गच्या वायव्येस सु. ९३ किमी.वर फ्रेंच सीमेजवळ, झार नदीवर हे शहर असून झारलँडच्या लोखंड व पोलाद उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. येथे प्रकाशीय उपकरणे, सिमेंट, कपडे, साखर, बीअर, चिनी मातीची भांडी, छपाई, कागद व कोळसा खाणी हे व्यवसायही चालतात. हे झारलँडच्या कोळसा क्षेत्राचे औद्योगिक, व्यापारी व सांस्कृतिक केंद्र आहे. १३२१ मध्ये वसलेले हे गाव १७९३ मध्ये फ्रेंचांनी घेतले. नेपोलियनच्या पराभवानंतर ते प्रशियास मिळाले. १९५७ मध्ये झारलँडबरोबरच ते परत प. जर्मनीत गेले. दुसऱ्या महायुद्धातील बाँबहल्ल्यांतून येथील तेराव्या शतकातील चर्च, अठराव्या शतकातील नगरभवन व किल्ला या ऐतिहासिक इमारती वाचल्या. झारलँड विद्यापीठ येथेच आहे.
शहाणे, मो. ज्ञा.