झायलोफोन : काष्ठतरंग. आघातवाद्याचा एक प्रकार. ‘झायलोफोन’ या मूळ ग्रीक संज्ञेचा अर्थ लाकडी ध्वनी. सुरात लावलेल्या लाकडी पट्ट्यांवर काठ्यांनी आघात करून हे वाद्य वाजविले जाते. त्याचा पल्ला मध्य ‘सी’ स्वरापासून तीन सप्तकांपर्यंत असतो. हे वाद्य फार प्राचीन काळापासून वापरात आहे. आदिम, विशेषतः आफ्रिकन, संस्कृतीमध्ये ते फार लोकप्रिय होते. जावानीज वाद्यसंगीतातही विकसित स्वरूपात त्याचा वापर झाला. हे वाद्य यूरोपामध्ये १५११ च्या सुमारास ‘Holzernes Gelachter’ (वुड्न पर्कशन), ‘Strohfiedel’ (स्ट्रॉफिडल) अशा नावांनी अवतरले. १८३० च्या दरम्यान मीकाल यूझेप गुझिकोव्ह हा झायलोफोनवादक नावारूपास आला होता. सँसांस या फ्रेंच संगीतकाराने आपल्या ‘Danse Macabre’ (१८७४) या रचनेमध्ये हे वाद्य प्रभावीपणे हाताळले. विसाव्या शतकातील गुस्ताव्ह मालर, ईगर स्ट्राव्हिन्स्की, डिमीट्री शस्तकॉव्ह्यिच इ. संगीतकारांनी आपल्या ‘सिंफनी ’ वाद्यवृंदांमध्ये झायलोफोनचा परिणामकारक उपयोग केला. अत्याधुनिक जन (पॉप) संगीतातही या वाद्यास खास स्थान लाभले आहे.
रानडे, अशोक