झाग्रेब : यूगोस्लाव्हियाच्या क्रोएशिया प्रजासत्ताकाची राजधानी. लोकवस्ती ५,६६,०८४ (१९७१). हे साव्हे नदीच्या पूरमैदानातील ऐतिहासिक शहर असून यूगोस्लाव्हियाचे सर्वांत मोठे औद्योगिक केंद्र आहे. येथे अवजड यंत्रसामग्री, रेल्वे वाघिणी व डबे, विजेची उपकरणे, सिमेंट, कापड, पादत्राणे, रसायने, औषधे, कागद, अन्नपदार्थ इत्यादींचे उत्पादन होते. हे रेल्वे, सडका व वायुमार्ग यांचे प्रस्थानक असून येथे आंतरराष्ट्रीय व्यापारजत्रा भरते.
झाग्रेब हे शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र असून येथे विद्यापीठ, विज्ञान-कला-नाट्य-संगीत-अकादमी, कलावीथी, संग्रहालये, उद्याने इ. आहेत. हे राज्याच्या राजकीय चळवळीचे व स्वातंत्र्य संग्रामाचेही प्रमुख केंद्र होते.
लिमये, दि. ह.