झांग-माघियाना : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील झांग जिल्ह्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,३६,००० (१९७२ अंदाज). हे चिनाब नदीच्या डाव्या किनाऱ्याजवळ लाहोरच्या पश्चिम नैर्ऋत्येस १९३ किमी. आहे. झांग आणि माघियाना ही दोन गावे जोडून येथे १८६७ मध्ये नगरपालिका स्थापिली गेली. यांत माघियाना मुख्य असून माघियाना सियाळचा पूर्वज मेघा याने ते पंधराव्या शतकात वसविले. हे ग्रँड ट्रंक रोडने पेशावर व लाहोरशी जोडलेले आहे. माघियाना हे रेशीम गोळा करण्याचे केंद्र असून येथे हातमागाचा उद्योगही चालतो. येथे साबण, कातडी सामान, कुलुपे, पितळेची भांडी इ. उत्पादन होते. झांग हे शासकीय ब्लँकेट पुरवठ्याचे केंद्र आहे. शहरात दवाखाना, सार्वजनिक उद्याने व शासकीय महाविद्यालय आहे.

ओक, द. ह.