जेस्नेरिया डग्लसी : (कुल-जेस्नेरिएसी). ही शोभादायक, लहान व बहुवर्षायू (अनेक वर्षे जगणारी) ओषधी [→ ओषधि] मूळची द. अमेरिकेतील (ब्राझील) असून तिचा प्रसार सर्वत्र बागेतून झाला आहे. जेस्नेरिया हे वंशवाचक लॅटिन नाव प्रसिद्ध निसर्गशास्त्रज्ञ कोनराट गेस्नर (१५१६–६५) यांच्या नावावरून दिले आहे. या वनस्पतीस जमिनीपासून सु. पंधरा सेंमी. उंचीवर पाच ते सात साध्या, अंडाकृती व दंतुर पानांचा झुबका असून शेंड्याकडे आखूड परिमंजिरीवर [→ पुष्पबंध] लहान, नलिकाकृती, गुलाबी किंवा नारिंगी, रेषांकित अथवा कडेला लालरंगी ठिपके असलेली फुले येतात. ती द्विलिंगी, एकसमात्र, मुक्तप्रदल (सुट्या पाकळ्यांची) पंचभागी असतात [→ फूल]. नवीन लागवड अधश्चरापासून (मुनव्यापासून) करतात. ग्लॉक्सीनिया मॅक्युलेटा शिलापुष्प कुलातील आहे. दोन्ही बागेत लावतात.
पहा : जेस्नेरिएसी.
महाजन, श्री. द.