जेस्नेरिएसी : (शिलापुष्प कुल). द्विदलिकित वनस्पतींचे [→ वनस्पति, आवृतबीज उपविभाग] एक मोठे कुल. याचा अंतर्भाव पर्सोनेलीझ गणात करतात एंग्लर व प्रांटल यांनी ट्युबिफ्लोरीत केला होता. यामध्ये सु. १०० वंश व १,१०० जाती (विलिस : १२० वंश व २,००० जाती लॉरेन्स : ८५ वंश व १,२०० जाती) समाविष्ट केल्या असून त्या ⇨ओषधी किंवा लहान झुडपे व क्वचित वृक्ष आहेत, काही ⇨अपिवनस्पती व काही मुळांच्या साहाय्याने वर चढणाऱ्या वेली आहेत आणि त्यांचा प्रसार उष्ण व उपोष्ण कटिबंधांत आहे आग्नेय आशिया, पॉलिनेशिया व अमेरिकेतील उष्ण प्रदेश येथे विशेषेकरून या वनस्पती आढळतात. यांची साधी पाने बहुधा समोरासमोर, अखंड, क्वचित दातेरी किंवा खंडित व उपपर्णहीन असतात. काहींना जमिनीत जाडजूड (मूलक्षोड) खोड असते, तर काहींना जमिनीत आडवे वाढणारे बारीक धुमारे (धावती खोडे) असतात. फुलोरा बहुधा कुंठित (मर्यादित) तर कधी फुले एकएकटी ती द्विलिंगी, एकसमात्र (एका उभ्या पातळीने दोन सारखे भाग होणारी), पंचभागी आणि आकर्षक संदले व प्रदले प्रत्येक जुळलेली केसरदले चार, द्वयोन्नत (दोन लहान व दोन मोठी), पाच किंवा दोन आणि पाकळ्यांस चिकटलेली दोन ऊर्ध्वस्थ किंजदलांच्या किंजपुटात बहुधा एक कप्पा व त्यात अधोमुख अनेक बीजके काहींत कमीजास्त अधःस्थ किंजपुट तर काहींत दोन कप्पे असतात विविध प्रकारचे बिंबही असते [→ फूल]. मृदुफळ किंवा शुष्कफळ (बोंड) बोंड तडकून दोन किंवा चार शकले होतात बिया लहान, असंख्य, सपुष्क (गर्भाबाहेर अन्नांश असलेल्या) किंवा अपुष्क. या कुलाचे ब्राह्मी कुल, टेटू कुल व बंबाखू कुल (ऑरोबँकेसी) यांच्याशी बरेच साम्य असून शिलापुष्प कुलापासून ऱ्हास पावून बंबाखू कुल निघाले असावे, असे काहींचे मत आहे ⇨जेस्नेरिया डग्लसी, जेस्नेरिया स्मिथियाना आणि सिनिजिया, ॲकिमेनीस, ग्लॉक्सीनिया, इपिसिया, नेगेलिया इ. वंशांतील अनेक जाती शोभेकरिता बागेत लावतात ⇨पाथरफोडी (सं. शिलापुष्प) औषधी आहे. तीवरून मराठी कुलनाम दिले आहे. भारतात जंगली अवस्थेत व बागेत मिळून सु. वीस वंशांतील जाती आढळतात.
पहा : बिग्नोनिएसी स्क्रोफ्यूलॅरिएसी.
संदर्भ : Rendle, A. B. The Classification of Flowering Plants, Vol. II, Cambridge, 1963.
परांडेकर, शं. आ.