जेझुइट : रोमन कॅथलिक चर्चमधील एक धार्मिक संस्था वा संघटना. १५३४ मध्ये इग्नेशिअस लॉयोला (१४९१–१५५६) ह्याने ‘सोसायटी ऑफ जीझस’ ह्या नावाने ह्या धार्मिक संस्थेची १५ ऑगस्ट १५३४ मध्ये स्थापना केली. ह्या संस्थेच्या सभासदांना ‘जेझुइट’ म्हणतात. ते आपल्या नावाच्या शेवटी ‘एस्. जे.’ ही अक्षरे लावतात. २७ सप्टेंबर १५४० मध्ये तिसरा पोप पॉल याने ह्या संस्थेस मान्यता दिली. ‘टू द ग्रेटर ग्लोरी ऑफ गॉड’ हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. सुरुवातीस तिचे स्वरूप काहीसे लष्करी पद्धतीचे होते. संस्थेचा प्रमुख हा संस्थेचा सर्वाधिकारी असतो. त्याची सत्ता अमर्याद व नेमणूक कायम स्वरूपाची असते. संस्थेची घटना त्याला योग्य न वाटल्यास प्रसंगी तो आपल्या इच्छेनुसार ती तात्पुरती स्थगित करू शकतो तथापि ह्या घटनेत फेरबदल करण्याचे अधिकार मात्र त्याला नाहीत.
ह्या संस्थेच्या सभासदांना दोन वर्षे उमेदवारी केल्यानंतर पुढील चार व्रते स्वीकारून त्यांचे काटेकोरपणे पालन करावे लागते : (१) निष्कांचनत्व वा साधेपण, (२) शुचिता वा आजन्म ब्रह्यचर्यपालन, (३) आज्ञापालन व (४) धार्मिक बाबतीत पोपचा आदेश निरपवादपणे मान्य करणे. आज्ञापालनाच्या व्रतात ह्या संस्थेचे सामर्थ्य प्रत्ययास येते. ह्या संस्थेच्या सभासदास जगातील कोणत्याही प्रदेशात पाठविले व कोणत्याही कार्यास वाहून घेण्याचा आदेश देण्यात आला, तरी तो तात्काळ पालन केला जातो.
संस्थेच्या सभासदांचे दीक्षित (स्कोलॅस्टिक्स) व अदीक्षित (ब्रदर्स) असे दोन वर्ग असून त्यांच्या प्रशिक्षणाचे चढत्या क्रमाने पुढीलप्रमाणे सहा टप्पे आहेत : (१) नवागत (नॉव्हिस), (२) पीठवासी पंडित (स्कोलॅस्टिक), (३) सांसारिक वा लौकिक मदतनीस (द फॉर्म्ड टेंपोरल कोॲड्जुटर), (४) आध्यात्मिक मदतनीस (द फॉर्म्ड स्पिरिच्युअल कोॲड्जुटर), (५) तीन व्रतांना वाहून घेणारा आणि (६) चारही व्रतांना वाहून घेणारा.
रोमन कॅथलिक पंथाचे शैक्षणिक कार्य सर्वस्वी या संस्थेवर सोपविण्यात आले आहे. या धर्तीवरच १६०९ मध्ये मेरी वॉर्डने (१५८५–१६४५) ‘जेझुइटेस’ ह्या नावाची केवळ स्त्रियांसाठी एक संस्था स्थापन केली परंतु १६६० मध्ये ती विसर्जित करण्यात आली. १७०३ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ मेरी’ ह्या नावाने तिचे पुनरुज्जीवन करण्यात आले.
ह्या संस्थेचे सभासद फार कावेबाज व फसवे असतात, असा समज काही ऐतिहासिक घटनांमुळे रूढ झाला होता. त्यामुळे ‘जेझुइट’ ह्या शब्दाचा अर्थच ‘धूर्त’ किंवा ‘कावेबाज’ असा समजण्यात येई.
शिक्षण क्षेत्रातील नैपुण्य, कार्यक्षमता व कडक शिस्तपालन ह्या गुणांमुळे ही संस्था जेवढी नावारूपास आली, तेवढीच ती विरोधकांच्या रोषासही पात्र ठरली. कॅथलिक शिक्षणाच्या क्षेत्रात जेझुइटांचे कार्य विशेष उल्लखनीय आहे. संस्थेच्या शाखा सर्व जगभर पसरलेल्या आहेत.
संदर्भ : 1. Brodrick, James, The Origin of the Jesuits, New York, 1940.
2. Guilbert, y3wuoeph de, The Jesuits, Chicago, 1964.
आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला