जेजुरी : पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध देवस्थान. लोकसंख्या ४,१७१ (१९७१). हे पुणे–नीरा रस्त्यावर पुण्यापासून सु. ५२ किमी. आणि सासवडहून सु. १६ किमी. असून पुणे–मिरज रुंदमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. येथील मल्हारी मार्तंड म्हणजेच खंडोबा दैवत महाराष्ट्रात व कर्नाटकात विशेष प्रसिद्ध आहे. जुने देऊळ कडेपठारावर, गावापासून सु. ३·५ किमी.वर आणि १२२ मी. उंचीवर आहे. गावाजवळील सु. 

खंडोबाचे देवालय, जेजुरी.

७६ मी. उंचीच्या टेकडीवरील देऊळ हेच सध्याचे खंडोबाचे मुख्य देवस्थान होय. या देवळास १६६२ मध्ये शहाजीने भेट दिली होती. वर जाण्यासाठी तीन बाजूंनी सुबक पायऱ्यांच्या वाटा असून उत्तरेची वाट मुख्य होय. पायऱ्यांच्या दुतर्फा अनेक दीपमाळा दिसतात. देवळाभोवती फरसबंदी आवार व तट आहे. दुसरा बाजीराव व अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले तलाव प्रक्षेणीय असून मल्हारराव होळकरांच्या स्मरणार्थ बांधलेले महादेवाचे मंदिरही प्रेक्षणीय आहे. येथील राममंदिरात एक शिलालेख आहे. आजूबाजूचा प्रदेश सुपीक आहे. येथे १८६८ पासून नगरपालिका असून धर्मशाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा वगैरे सोयी आहेत. चैत्री पैर्णिमा, विजयादशमी, चंपाषष्ठी आणि सोमवती अमावस्या या दिवशी येथे मोठी यात्रा भरते.   

                                          कापडी, सुलभा