महादेवाचे मंदिर, जेऊर; वरच्या चौकटीत मंदिरातील काशीलिंगाचे छायाचित्र.

जेऊर : सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील देवस्थान. लोकसंख्या ५,९४५ (१९७१). हे अक्कलकोटच्या नैर्ऋत्येस सु. १३ किमी. आहे. येथील प्राचीन शिवालयातील शिवलिंगाखालून सतत पाणी झुळझुळत असते. पूर्वी याला भक्तेश्वराचे मंदिर म्हणत. श्रावणात प्रत्येक सोमवारी या शिवालयात गंगा येते, अशी भाविकांची श्रद्धा आहे, त्या वेळी गाभारा दुधी रंगाच्या पाण्याने भरून जातो. त्यात पांढरी वाळू, शिंपले इ. वस्तू  सापडतात, असे म्हणतात. हे मंदिर हेमाडपंती शैलीचे असून कार्तिक शुद्ध पंचमीस येथे मोठी यात्रा भरते.

कांबळे, य. रा.