जुरा पर्वत : स्वित्झर्लंड व फ्रान्स यांच्या सीमेवरील वलीप्रवत. हा सु. २५० किमी. लांब, सु. ६४ किमी. रुंद व आजूबाजूच्या प्रदेशापेक्षा सु. ७५० मी. उंच आहे. नैर्ऋत्य-ईशान्य दिशेने गेलेल्या ह्या पर्वताच्या रांगा एकमेकींस समांतर असून ऱ्होन नदीपासून ऱ्हाईन नदीपर्यंत चापाकृती पसरलेल्या आहेत. नैर्ऋत्य जर्मनीतील जुराच्या फाट्यांस स्वेबीयन व फ्रँग्कोनीयन जुरा म्हणतात. जुरा पर्वताचे पहाडी जुरा व पठारी जुरा असे उंचीनुसार दोन भाग होतात. मध्यभागी व दक्षिणेस शँपान्यॉल, नॉझर्वा, ऑर्नँ इ. पठारे आहेत. पठारी जुराची सरासरी उंची ४५० ते ७६० मी. असून पहाडी जुराची सरासरी उंची ९१५ ते १,५२५ मी. आहे. स्वित्झर्लंडमधील टेंड्र पर्वतरांग १,६८३ मी. उंचीची आहे व दोल या शिखराची उंची १,६८० मी. आहे. फ्रान्समधील माँ ब्लांच्या वायव्येस सु. ८० किमी. वरील क्रे द ला नेझ या बर्फाच्छादित शिखराची उंची १,७१८ मी. आहे व रक्यूले शिखर १,७१७ मी. उंच आहे. बेलाफोअर, कॉल द ला फोसी, पाँतार्ल्ये इ. खिंडी व जिनीव्हा, नशाटेल, बील ही सरोवरे जुरा पर्वतप्रदेशात आहेत. वायव्येकडील व पश्चिमेकडील सपाट भागांत दू आणि सोन नद्यांची खोरी आहेत. फ्रान्समधील पठारी भागाचे मोठ्या प्रमाणावर खनन होऊन प्रायः समतल मैदान तयार झाले आहे. पठारी भागाची लोकवस्ती वाढावी म्हणून हा भाग करमुक्त ठेवला होता. पर्वतातील घळयांस तेथे ‘क्लज’ म्हणतात. जुरा पवर्ताच्या भागात प्लाइस्टोसीन काळातील हिमानीक्रिया कमी प्रमाणात झाली आहे. जुराच्या पठारी भागात चुनखडीच्या प्रदेशातील विवरे, गुहा, भूमिगत नद्या, झरे व भेगा पहावयास मिळतात. जलभेद्य खडकही बऱ्याच ठिकाणी आहेत.
जुराचे खडक प्रामुख्याने जुरासिक काळातील जीवाश्मयुक्त अंदुकाश्मी (ओअलाइट) चुनखडक आहेत. सांरचनिक दृष्ट्या हा भाग द. यूरोपच्या तृतीयक कालीन वलीपर्वतांचा आहे. येथील चुनखडकांवरूनच मेसोझोइक कल्पाच्या १३ ते २० कोटी वर्षांपूर्वींच्या कालखंडास जुरासिक हे नाव दिले आहे. या पर्वताच्या प्राकृतिक भूरचनेचे वैशिष्ट्य म्हणजे या डोंगररांगेतील अपनत व अवनत घड्या आणि पर्वत व दऱ्या यांच्यात एकप्रकारची सुसंगती आढळते. आग्नेयीकडील तीव्र उताराच्या समान घडीच्या डोंगररांगा अरुंद घळयांनी एकमेकांपासून अलग झालेल्या आहे. वायव्य भागात प्रस्तरभंगामुळे डोंगररांगा ऊर्मिल पठारांच्या पायऱ्यापायऱ्यांनी सपाट मैदानात एकदम उतरलेल्या दिसतात. जुरा पर्वताचा भाग म्हणजे अल्पाइन घडीची अग्रभूमी आहे.
जुराच्या पश्चिम उतारावर पश्चिमी वाऱ्यांचा परिणाम होतो. त्यामुळे तेथे आर्द्र हवामान असते. उन्हाळ्यात पाऊस अधिक पडतो. सरासरी १७५ सेंमी. पाऊस पडतो. हिवाळ्यात बर्फ पडते. उन्हाळ्यात वादळे होतात. उन्हाळे उष्ण, तर हिवाळे थंड व आर्द्र असतात. दू, आर, बिर्स व अँ या जुराच्या प्रदेशातील नद्या होत. पर्वताच्या उतरांवर सूचिपर्णी वृक्षांची दाट अरण्ये आहेत. उपत्यकेतील जमीन निकृष्ट असल्यामुळे शेती करणे कठीण आहे. पहाडी भागापेक्षा पठारी भागात लोकसंख्या विरळ आहे. जुरा म्हणजे जंगल. जुरा पर्वताचे उतार
वृक्षांची आच्छादलेले आहेत, त्यामुळे ते निसर्गरम्य वाटतात. निकृष्ट मृदांमुळे दऱ्या गवताने व्यापलेल्या आहेत. तेथे दुभत्या जनावरांचे कळप पाळतात. उन्हाळ्यात घोषस्थलांतर करून चीज तयार करतात. सहकारावर मोठा भर आहे. काही भागांतील जंगले तोडून तेथे गव्हासारखी अन्नधान्ये व द्राक्षे पिकविली जातात. खेळणी आणि फर्निचर बनविणे इ. जंगलावर आधारित उद्योगधंदे येथे महत्त्वाचे आहेत. जगप्रसिद्ध स्विस घड्याळांची निर्मिती याच भागात होते. मॉरेझ शहराच्या आसपासच्या भागात औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. दक्षिण भागातील जलविद्युत्शक्तीच्या निर्मितीमुळे सूत-उद्योगधंद्याच्या विकासास वाव मिळत आहे. याशिवाय अस्फाल्ट, संगमरवर, गारगोटी, ॲलबेस्टर इत्यादींच्या खाणी या भागात आहेत.
झे, सँ-क्लोद, मॉरेझ ही शहरे फ्रान्सच्या भागात आहेत व ली-लॉक्ल, शो-दु-ला-फाँ, दलेमाँ ही शहरे स्वित्झर्लंडमध्ये आहेत. जुरातून चार लोहमार्ग व चार सडका जुराच्या दोहोबाजूंच्या देशांस जोडतात. येथील खिंडी व रस्ते यूरोपात पूर्वीपासून मोक्याचे ठरलेले आहेत.
क्षीरसागर, सुधा
“