जीवपूर्व : (अझोइक). पृथ्वीवर जीव निर्माण होण्यापूर्वी जो कालविभाग आहे. त्याला जीवपूर्ण महाकल्पात व त्या महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला जीवपूर्ण गट म्हणतात. कँब्रियन कल्पाच्या (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वींच्या) आधीच्या काळात जे खडक निर्माण झाले आहेत, त्यांच्यात जीवाश्म (जीवांचे शिळारूप अवशेष) अजिबात आढळत नसल्याने त्यांची गणना जीवपूर्ण गटात होते. अझोइक या ग्रीक शब्दाचा अर्थ जीवहीन वा जीवन सुरू होण्यापू्र्वीचे असा आहे. मात्र नावाप्रमाणे या काळात जीवांचे अस्तित्व मुळीच नव्हते, असे नसून त्या सजीवांच्या दृश्य खुणा खडकांत आढळत नाहीत. परंतु अप्रत्यक्ष पुराव्यावरून सजीवांची उत्पत्ती होऊन किमान दोन-तीन अब्ज वर्षे लोटली असावीत. हे पाहता या काळात ‘जीवपूर्ण’ हे नाव यथातथ्य राहिलेले नाही. कधीकधी याची ⇨आर्कीयनशीही तुलना करतात.
ठाकूर, अ. ना.