जीओक, विल्यम फ्रान्सिस : (१२ मे १८९५ – ). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ. १९४९ सालच्या रसायनशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म नायगारा फॉल्स, आँटॅरिओ (कॅनडा) येथे झाला व शिक्षण नायगारा फॉल्स कॉलेजिएट संस्थेत आणि बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात झाले. १९२० मध्ये ते सर्वोच्च मान मिळवून बी.एस्. झाले व १९२२ मध्ये पीएच्.डी. ही पदवी संपादन केल्यावर त्यांची त्याच विद्यापीठात निर्देशक म्हणून नेमणूक झाली. १९३४ मध्ये ते तेथेच रसायनशास्त्राचे प्राध्यापक झाले.
त्यांनी १९२६ मध्ये १° के. तापमानापेक्षा कमी तापमान मिळविण्यासाठी अक्रमी विचुंबकीकरण (उष्णतेचा लाभ वा व्यय न होता चुंबकत्व नाहीसे करण्याची) पद्धती सुचविली. हीच पुढे १९५३ मध्ये त्यांनी डी. पी. मॅक्डूगल यांच्या सहकार्याने प्रत्यक्ष वापरून यशस्वी केली. १° के. तापमानापेक्षा कमी तापमान वापरून करावयाच्या प्रयोगांत ही पद्धत आता वापरली जाते. १९२९ मध्ये एच्.एल्.जॉनस्टन यांच्या सहकार्याने त्यांनी वातावरणातील ऑक्सिजनातील १७ आणि १८ या अणुभारांचे ऑक्सिजनाचे समस्थानिक (अणुक्रमांक तोच परंतु भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) शोधून काढले व अशा प्रकारे भौतिकीय व रासायनिक अणुभार-मापक्रमातील फरक त्यांनी दाखवून दिला. नीच तापमान असताना उष्णतामापन पद्धतीने काढलेली वायूंची ⇨ एंट्रॉपी मूल्ये व वर्णपटाच्या साहाय्याने काढलेली एंट्रॉपी मूल्ये यांची तुलना करून जीओक यांनी सांख्यिकीय ⇨ ऊष्मागतिकी आणि ऊष्मागतिकीचा तिसरा नियम यांचा पाया मजबूत करण्यास मदत केली. त्यावरून या नियमाला असलेल्या भासमान अपवादांचे स्वरूप कळून येण्यास मदत झाली.
ऊष्मागतिकी या विषयावरील मौलिक संशोधनाबद्दल आणि निरपेक्ष शून्याच्या [→ केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम] जवळपास असलेल्या तापमानाच्या अवस्थेत द्रव्यांच्या गुणधर्मांसंबंधीच्या अभ्यासाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांना चांडलर, क्रेसन, गिब्ज व लेविस ही बहुमानाची पदकेही मिळाली आहेत. १९३६ साली त्यांची अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून निवड झाली.
जमदाडे, ज. वि.