जॉन, ऑगस्टस एड्विन : (४ जानेवारी १८७८–३१ ऑक्टोबर १९६१). इंग्रज चित्रकार. टेन्बी, वेल्स येथे जन्म. लंडनच्या ‘स्लेड स्कूल ऑफ आर्ट’ मध्ये शिक्षण (१८९४–९८). पुढे लिव्हरपूल विद्यापीठात कलेचे अध्यापन (१९०१-०४). १९०० पासून ‘न्यू इंग्लिश आर्ट क्लब’ मधून त्यांची चित्रे प्रदर्शित होऊ लागली. त्याचे असाधारण रेखनकौशल्य व उत्कृष्ट व्यक्तिचित्रण यांमुळे तो अल्पावधीतच प्रसिद्धीस आला. त्याने वेल्स, आयर्लंड इ. ठिकाणी जिप्सींसारख्या भटक्या लोकांबरोबर बरीच भ्रमंती केली. त्यामुळे त्यांचे जीवन त्याला जवळून न्याहाळता आले. त्याच्या या स्वैर व स्वच्छंद अनुभूतींचे दर्शन एन्कँपमेंट ऑन डार्टमूर (१९०६) यांसारख्या चित्रांतून घडते. ‘कॅनॅडियन्स कोअर’चा युद्धचित्रकार म्हणून त्याने पहिल्या महायुद्धात भाग घेतला. कॅनॅडियन्स ऑपोझिट लेन्स (१९१९) हे त्याचे व्यंगात्म भित्तिचित्र या अनुभवावर आधारलेले आहे. प्रामुख्याने व्यक्तिचित्रकार म्हणूनच त्याची ख्याती आहे. हार्डी, शॉ, येट्स, जॉइस, रॉय कँपबेल, डिलन टॉमस अशा प्रख्यात लेखकांची व्यक्तिचित्रे त्याने चितारली. द स्माइलिंग वूमन (१९१०) हे त्याचे एक श्रेष्ठ व्यक्तिचित्र. रेखनातील नेमकेपणा व रंगांचे व्यक्तिस्वभावनिदर्शक उपयोजन यांमुळे त्याची व्यक्तिचित्रे सरस ठरली आहेत. दृश्य विश्वाविषयीच्या त्याच्या सखोल आस्थेचा प्रत्यय त्याच्या व्यक्तिचित्रांप्रमाणेच निसर्गचित्रांतून व स्थिरवस्तूचित्रांतूनही येतो मात्र लिरिक फँटसीसारख्या भव्य भित्तिचित्रांतून त्याची तरल कल्पकताच विशेषत्वाने दिसून येते. १९२८ मध्ये ‘रॉयल अकॅडमी’चा सभासद म्हणून त्याची निवड झाली. १९३८ मध्ये त्याने सभासदत्वाचा राजीनामा दिला परंतु १९४० मध्ये त्याची पुनर्नियुक्ती करण्यात आली. १९४२ मध्ये त्याला ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा बहुमान लाभला. त्याने लिहिलेला क्यारोस्कूरो : फ्रॅग्मेंट्स ऑफ ऑटोबायॉग्रफी (१९५२) हा आठवणींचा संग्रह प्रसिद्ध आहे. फोर्डिंगब्रिज हँपशर येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : Rothenstein, John, Augustus John, London, 1974.
इनामदार, श्री. दे.