जिआंगसी : किआंगसी. चीनच्या आग्नेय भागातील प्रांत. क्षेत्रफळ १,६४,७९९ चौ. किमी. लोकसंख्या २,५०,००,००० (१९७३). याच्या उत्तरेस आन्हवे, वायव्येस हुपे, पश्चिमेस हूनान, दक्षिणेस ग्वांगटुंग, पूर्वेस फूक्येन व ईशान्येस सिक्यांग प्रांत आहेत. हा प्रांत प्राचीन काळापासून सैनिकी हालचाली, व्यापार आणि लोकांचे स्थलांतर या दृष्टींनी मोक्याचा ठरलेला, पोयांग सरोवरास मिळणारी गान व तिच्या उपनद्या यांच्या पर्वतवेष्टित सुपीक खोऱ्याचा प्रदेश होय.
जिआंगसीचे हवामान उपोष्ण कटिबंधीय असून जानेवारीत उत्तर भागात सरासरी तपमान–४° से. आणि दक्षिण भागात ४° से. पर्यंत असते. वार्षिक सरासरी पाऊस १२० सेंमी. ते १५० सेंमी. असतो. तांदूळ, गहू, वाटाणा, भुईमूग, ऊस, रताळी, कापूस, रॅमी, तंबाखू, चहा, सोयाबीन इ. पिके होतात. संत्री, मोसंबी, कलिंगडे, सफरचंद व इतर अनेक फळेही पुष्कळ होतात. येथील जंगलांत बांबू, पाईन, फर, सीडार, ओक, वड, कापूर इ. वृक्ष विपुल आहेत. चीनमधील बहुतेक टंगस्टन जिआंगसीत सापडते. कोळसा आणि केओलीन ही येथील दुसरी महत्त्वाची खनिजे होत. चीनमध्ये चिनी मातीच्या भाड्यांना लागणारी २/३ केओलीन माती जिआंगसीत मिळते.
कापडचोपड, ट्रॅक्टर, विजेचे सामान, आगपेट्या, सिगारेटी, विजेचे दिवे, रसायने, कागद, साखर, रॅमीचे सूत व कापड, कापूर, विजेच्या मोटारी, रंग, डांबर, तागाचे कापड इत्यादींचे लहानमोठे कारखाने प्रांतात सर्वत्र आहेत. चिनी मातीची भांडी व शोभेच्या वस्तू हा येथील परंपरागत प्रसिद्ध व्यवसाय आहे. जंगलांपासून इमारती लाकूड, तुंग तेल, टर्पेंटाइन, राळ, कापूर, काजळ ही मिळतात. काजळापासून सुप्रसिद्ध चिनी काळ्या शाईच्या कांड्या तयार करतात.
वरील अंतर्गत वाहतूक जलमार्गाने होते. जीओजीआंग ते नानचांग, चेक्यांग ते हूनान, यिंगटान ते ॲमॉय हे प्रमुख लोहमार्ग आहेत. जलवाहतुकीला पूरक अशा सडकाही असल्याने व्यापाराला पुष्कळच मदत होते.
जिआंगसीवर जौ, सुंग वगैरे अनेक घराण्यांनी राज्य केले. चिनी कम्युनिस्ट राजवटीच्या इतिहासात जिआंगसी प्रांताला फार महत्त्व आहे. नानचांग शहरी जू-दने कम्युनिस्टांचे पहिले सैन्य उभारले व नोव्हेंबर १९३१ मध्ये र्वेजिन शहरी चिनी कम्युनिस्ट लोकसत्ताकाची घोषणा होऊन माओ-त्से-तुंगला राज्याचे अध्यक्षपद मिळाले. १९३४ मध्ये चँग कै-शेकने कम्युनिस्टांना हुसकावून लावले परंतु १९४९ मध्ये जिआंगसी प्रांत पुन्हा कम्युनिस्ट राजवटीखाली आला.
जिआंगसीत अलीकडे वैद्यकीय मदत व रुग्णालये यांची वाढ झाली आहे. कामगारांच्या सुखसोयी आणि शिक्षण यांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. शिक्षण घेता घेता अर्थोत्पादनही व्हावे यावर कटाक्ष आहे. जिआंगसी कामगार विद्यापीठात उच्च शिक्षणाबरोबरच रस्ते बांधणी, गावे वसविणे, भूमिसंपादन, कारखाने उभारणे, वनसंवर्धन यांवरही भर दिला जातो.
राजधानी नानचांगखेरीज जीओजीआंग हे नदीबंदर आणि गूलिंग, जीआन, गान्जो ही प्रमुख शहरे आहेत.
ओक, द. ह.