किर्कूक : ईशान्य इराकमधील तेलासाठी प्रसिद्ध असलेल्या त्याच नावाच्या जिल्ह्याचे प्रमुख शहर. लोकसंख्या १,६७,४१३ (१९७०). हे लिटल झॅब नदीच्या दक्षिणेस, ख्रिस्त पूर्व ३,००० वर्षांपूर्वीचे ॲसिरियन अवशेष असलेल्या एका उंच टेकाडावर, बगदादच्या उत्तरेस ३८६ किमी. व मोसूलच्या आग्नेयीस १४४ किमी. आहे. किर्कूकच्या ईशान्येस ९६ किमी. वर इराणची सीमा आहे. शेतमालाची बाजारपेठ, व्यापारी केंद्र आणि लष्करी ठाणे म्हणून किर्कूकची पूर्वीपासून ख्याती आहे. शहराच्या पूर्वेस व दक्षिणेस असलेल्या कुर्दिश-पर्शियन पर्वतश्रेणींवर ह्या ठिकाणाहून नियंत्रण ठेवता येते. १९१८ नंतर पेट्रोलियम उद्योगामुळे किर्कूकची जलद वाढ झाली. इराकी पेट्रोलियम कंपनीचे प्रमुख ठाणे येथेच आहे. किर्कूक तेलखाणींपासनू भूमध्य समुद्रापर्यंत १,२८० किमी. लांबीचे तेलनळ टाकण्यात आले असून, एक फाटा हैफाकडे व दुसरा ट्रिपोलीकडे जातो. रेल्वेने किर्कूक बगदादशी व बसऱ्याशी आणि रस्त्याने मोसूलशी जोडलेले आहे.
गद्रे, वि. रा.