किन्शासा : १९६६ पर्यंतचे लिओपोल्डव्हिल. काँगो लोकशाही गणराज्याची (आता झाईरे) आणि किन्शासा प्रांताची राजधानी. लोकसंख्या १३,२३,०३९ (१९७०). काँगो नदीमधील स्टॅन्लीपूल या सरोवरसदृश भागाच्या दक्षिण तीरावर किन्शासा वसले असून उत्तर तीरावर काँगो प्रजासत्ताकाची राजधानी ब्रॅझाव्हिल आहे. किन्शासा व किंतांबो ही मूळची दोन खेडी. १८८१ मध्ये प्रसिद्ध समन्वेषक स्टॅन्ली याने किंतांबोला आपला आश्रयदाता बेल्जियमचा राजा लीओपोल्ड याचे नाव दिले. १९२०—६० पर्यंत ही बेल्जियमच्या या वसाहतीची राजधानी होती. रुंद वृक्षाच्छादित रस्ते, उंच आधुनिक इमारती, दोन मोठी प्रेक्षागारे, उद्याने, निरनिराळी संग्रहालये, लोवेनियम विद्यापीठ (स्थापना १९५४) ललित कला अकादमी, विविध शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि शासकीय कचेऱ्या यांमुळे किन्शासास महत्त्व आले आहे. शहरात अन्नप्रक्रिया, कातडी कमावणे, लोखंडी वस्तू, लाकूडकाम, फर्निचर, रसायने, कापड, साबण, मद्य, खजिन तेल, बोटी इत्यादींचे उद्योग असून दक्षिण आफ्रिकेतील ही मोठी व्यापारपेठ समजली जाते. किन्शासापासून किसांगानी (स्टॅन्लीव्हिल) पर्यंत १६९० किमी. काँगो नदीवर नियमित वाहतूक चालते. याशिवाय रेल्वेने किन्शासा साँगोलोलो (माताडी) बंदराशी जोडलेले आहे. किन्शासाहून सर्व बाजूंस मोटार वाहतूक असून तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 

शाह, र. रू.