कॉसमॉस : पावसाळ्याच्या शेवटी बागेला शोभा आणणाऱ्या वनस्पतींपैकी काही या वंशांतील वनस्पती आहेत. याच्या सु. वीस जाती असून मूलस्थान अमेरिकेच्या उष्ण भागात (मुख्यत: मेक्सिकोत) आहे या वर्षायू वा बहुवर्षायू (एक वा अनेक वर्षे जगणाऱ्या)⇨ ओषधींची खोडे ०⋅५ – १⋅५ मी. उंच व पाने संयुक्त, समोरासमोर, पिच्छाकृती (पिसासारखी) असतात. अनेकदा विभागल्याने दलके बारीक. फुलोरे [स्तबके, → पुष्पबंध] फांद्यांच्या टोकास एकेकटे किंवा दोन चार स्वतंत्र फांद्यांवर येतात. स्तबकांचे रंग पांढरा, किरमिजी, किंचित लालसर (कॉ. बायपिनॅटस), क्वचित पिवळा (कॉ. सल्फ्यूरियम) अथवा ‘काळा’ (कॉ. डायव्हरसिफोलियस) काळ्याची किरण-पुष्पके गर्द गुलाबी किंवा निळी आणि बिंब-पुष्पके इतरांप्रमाणे पिवळी असतात. बिंब-पुष्पके द्विलिंगी व नलिकाकृती असून किरण-पुष्पके जिव्हिकाकृती (जिभेसारखी) व वंध्य असतात [→ फूल]. ⇨ कंपॉझिटी कुलातील हा वंश असल्याने इतर सामान्य लक्षणे त्या कुलाच्या वर्णनाप्रमाणे. कॉ. बायपिनॅटस या वर्षायू जातीपासून अनेक इतर जाती व प्रकार संकराने उद्भवले आहेत. कॉ. अट्रासॅंग्विनीयस ही जाती बहुवर्षायू असून स्तबकावर लाल बिंब पुष्पके व गर्द मखमली लाल किरण-पुष्पके असतात यालाही काहीजण ‘काळा कॉसमॉस’ म्हणतात. नवीन लागवड बियांपासून होते. मेक्सिकोत कॉ. सल्फ्यूरियसपासून लाल नारिंगी रंग काढतात.
कॉसमॉसला मध्यम प्रतीची रेताड जमीन चांगली. भरपूर सूर्यप्रकाश मिळत असलेल्या वाफ्यात (किंवा प्रथम लहान खोक्यात अथवा परडीत) मे-जूनमध्ये बी पेरतात अडीच ते तीन महिन्यांनी फुले येतात. ती पुष्पपात्रात ठेवण्यात फार सोयीची असून अनेक रंगांची एकत्र ठेवल्यास शोभिवंत दिसतात. सौम्य हवामानाच्या ठिकाणी वर्षातील इतर ऋतूंतही लागवड करतात.
आफळे, पुष्पलता द.
“