कॉर्नप्लॉवर : (इं.ब्ल्यू बॉटल, बॅचलर्स बटन फ्रेंच पिंक लॅ. सेंटॉरिया सायनस कुल-कंपॉझिटी). बागेत शोभेकरिता सामान्यपणे लावली जाणारी फुलझाडांपैकी (आवृतबीज, व्दिदलिकित) ही वर्षायू (एक वर्ष जगणारी) [→ओषधी  श् ओषधि  मूळची] आग्नेय यूरोपातील असून सर्वत्र आढळते. उंची ६०—९० सेंमी. कोवळेपणी पांढरट लवदार पाने लांबट, अरुंद, कधी पिसासारखी थोडी विभागलेली. फुलोरे (स्तबक) निळे, जांभळे, लालसर किंवा पांढरे व लांब दांड्यावर असून छदे अरुंद व त्यांवर कडेने आखूड दाते असतात किरणपुष्पके मोठी, वंध्य व नलिकाकृती बिंब-पुष्पके लहान नलिकाकृती व व्दिलिंगी असतात. केसरदले स्पर्शग्राही असून कीटकाच्या स्पर्शाने आकुंचन पावतात व पराग केसरनलिकेबाहेर येतात [→पुष्पबंध फूल]. हे पराग नंतर कीटकांच्या शरीरास चिकटल्याने दुसर्‌‍या फुलाकडे नेले जातात [→परागण]. फुलांचा उपयोग तुरे, पुष्पपात्रे, गुहशोभा इत्यादींकरिता सर्रास करतात. हे जर्मनीचे राष्ट्रीय पुष्प् आहे. सें. मोशॅटा (स्वीट सुलतान) ही विविधरंगी व सुगंधी फुलांच्या प्रकारांची जाती बागेत लोकप्रिय आहे. कॉर्नप्लॉवरचे बी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये (कमी पावसाच्या प्रदेशात जून-जुलैत) पेरतात. डोंगराळ भागांत मार्च-एप्रिलमध्ये आणि ऑगस्ट ते ऑक्टोबरात पेरणी करतात. सामान्यपणे ३–३/) महिन्यांत फुले येतात. भरपूर सूर्यप्रकाश व चांगली खतावलेली जमीन असल्यास वाढ चांगली होते. या झाडावर क्वचित भुरी रोग पडतो, त्यावर गंधक भुकटीची उपाययोजना करतात. 

सें. सायनसची फुले स्तंभक (आकुंचन करणारी) असून डोळे आल्यास वेदना कमी करण्यास वापरतात. तसेच ती उत्तेजक, पौष्टिक व आर्तवजनक (मासिक पाळी सुरू करणारी) असतात. सें. कॅल्सिटापाची पाने अरब लोक डोकेदुखीवर वाटून लावतात. यूरोपात मुळांचे चूर्ण भगंदर व अश्मरीवर (खड्यावर) वापरतात, मद्यातून बीजांचे चूर्ण मुतखड्यावर देतात.

पहा: कंपोझिटी. 

परांडेकर, शं. आ.

कॉर्नप्लॉवर : (१) अमेरिकन कॉर्नप्लॉवर,(२) इंग्लिश कॉर्नप्लॉवर.