कॉर्दोव्हा – २: दक्षिण स्पेनमधील ऐतिहासिक टुमदार शहर व कॉर्दोव्हा प्रांताची राजधानी.
लोकसंख्या २,३५,६३२ (१९७०). दक्षिण स्पेनची प्रमुख नदी ग्वॉदलक्विवर हिच्या उजव्या तीरावर, कॉर्दोव्हा पर्वतपायथ्याशी आणि माद्रिदच्या ३२० किमी. दक्षिणेकडे हे वसले आहे. रोमन काळात हे भरभराटलेले शहर असून तेव्हापासूनच हे बुध्दिमंतांचे आगर समजले जाई. आठव्या शतकात इस्लाम अनुयायी मूरांच्या ताब्यात हे गेले. ७५६—१०३१ पर्यंत उमय्या शाखेतील अमीरांचे (व नंतर खलीफांचे) हे प्रमुख ठाणे होते. मूरांच्या कारकीर्दीत हे एक वैभवशाली नगर आणि कलासंस्कृतींचे माहेरघर बनले. मूर कलेचे अवशेष असलेल्या त्यावेळच्या अनेक वास्तू–शेकडो स्तंभ, प्रार्थनामंदिरे व इतर सभागृहे, क्षमेचे व्दार इ.- अद्यापही कॉर्दोव्हाची मानचिन्हे म्हणून जपून ठेवल्या आहेत. त्यावेळची एक मशीद मूर वास्तुकलेची सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणून जगन्मान्य असून मूरांचा अल् काझार राजवाडा व ज्यूंचे सिनेगॉग प्रसिद्ध आहेत. बाराव्या शतकानंतर शहराचे वैभव कमी झाले, तरी ग्वॉदलक्विवरच्या समृद्ध खोऱ्यात वसल्याने ते मागे पडले नाही. अरुंद, वेडेवाकडे व दगडांनी बांधलेले रस्ते, जुनी घरे यांमुळे आजही कॉर्दोव्हाचे मूर शहराचे स्वरूप दिसते. १६ कमानींच्या, २२० मी. लांबीच्या आणि दगडांनी बांधलेल्या मूरकालीन पुलापलीकडे नवीन कॉर्दोव्हा वाढले असून तेथे साखर शुध्दीकरण, मद्य, लाकूडकाम, सोन्याचांदीच्या वस्तू, धातुकाम, यंत्रे, रसायने, सिमेंट, चिनी मातीची भांडी, फरशा, खेळणी, अन्नपदार्थ, साबण, कातडीकाम इ. उद्योग चालतात. ‘कॉर्दोव्हा कातडी’ पूर्वीपासूनच मुलायमपणासाठी प्रसिद्ध असून येथील सोन्याचांदीच्या वस्तू यूरोपभर विख्यात आहेत. आसमंतात शिशाच्या व कोळशाच्या खाणी असून धान्य, ऑलिव्ह, द्राक्षे व भाजीपाला यांकरिता कॉर्दोव्हा व्यापारी पेठ समजली जाते.
शाह, र. रू.
“