कॉर्दोव्हा – १ : अर्जेंटिनाच्या मध्यभागातील कॉर्दोव्हा प्रांताची राजधानी व देशातील एक मोठे उद्योग केंद्र. लोकसंख्या ५,८९,००० (१९६०), हे प्रिमेरो नदीकाठी ब्वेनस एअरीझच्या ६४४ किमी. वायव्येस, निसर्गरम्य कॉर्दोव्हा डोंगराच्या पायथ्याशी आणि पॅंपासच्या समृद्ध गवताळ व कृषिप्रधान प्रदेशासन्निध वसले आहे. कॉर्दोव्हाजवळच प्रिमेरो नदीवर धरण व जलविद्युत्‌ केंद्र असून दक्षिण अमेरिकेत ते मोठ्यापैकी मानले जाते. या धरणामुळे कॉर्दोव्हाच्या आसमंतातील प्रदेश समृद्ध झाला असल्याने कॉर्दोव्हा शेतमाल, गुरे इत्यादींची बाजारपेठ तर बनली आहेच, परंतु विविध स्वयंचलित यंत्रे, वाहने, शेतीची अवजारे, कापड, कातडी वस्तू, काच अन्नप्रक्रिया इत्यादींच्या कारखानदारीमुळे कॉर्दोव्हास औद्योगिक दृष्ट्याही महत्त्व अाले आहे. येथे १६१३ साली स्थापन झालेले विद्यापीठ आहे. संग्रहालये, वेधशाळा, नाट्यगृहे व स्पॅनिश धर्तीचे जुने वास्तुशिल्प ही येथील सांस्कृतिक वैशिष्ट‌्ये आहेत.

शाह, र.रू.