कॉलबेअर, झां बातीस्त : (२९ ऑगस्ट १६१९— ६ सप्टेंबर १६८३). प्रसिद्ध फ्रेंच मुत्सद्दी व चौदाव्या लुईचा अर्थमंत्री. रीम्झ येथे एका सधन व्यापारी कुटुंबात त्याचा जन्म झाला. तो १६३९ मध्ये युद्ध खात्याचा सचिव व पुढे १६६५ मध्ये अर्थमंत्री बनला. १६६९ मध्ये आरमाराचे खातेही त्याच्या अखत्यारीत आले. आपल्या कारकीर्दीत त्याने फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल केले. प्रथम त्याने अनावश्यक कार्यालये बंद करून अंतर्गत खर्चात काटकसर केली फ्रान्सच्या व्यापारास उत्तेजन देऊन लहानमोठे धंदे सुरू केले व परदेशांशी व्यापार करण्यासाठी अनेक व्यापारी कंपन्या स्थापन केल्या. एवढेच नव्हे, तर त्याकरिता काही वसाहतीही स्थापण्यास त्याने सुरूवात केली. व्यापारवाढीसाठी त्याने काही बंदरे दुरुस्त केली, तर काही नवीन उभारली व आरमार वाढविले. त्याच्या मृत्यूसमयी फ्रान्सजवळ जवळजवळ ३०० युद्धनौका होत्या. त्याने कला व शिक्षण ह्यांसही प्रोत्साहन दिले. विद्वानांना राजाकडून आर्थिक साहाय्य मिळवून देण्याची त्याने व्यवस्था केली कला व विज्ञान ह्यांच्या अकादमी स्थापन केल्या. तसेच ‘एकोल द रोम’ सारख्या शैक्षणिक संस्था व वेधशाळा सुरू करून संशोधन कार्यास चालना दिली. ह्याशिवाय त्याने एका आयोगाद्वारे फौजदारी व दिवाणी कायद्यांत सुधारणा केल्या आणि दिवाणी कायद्याचे संस्करण केले. तसेच त्याने सागरी व वसाहतविषयक कायद्यांच्या संहिता तयार केल्या. अर्थक्षेत्रातील हा सुधारक व मोठा संघटक पॅरिस येथे मरण पावला.
संदर्भ : Cole, C. W. Colbert and a Century of French Mercantillism, 2 Vols., London, 1939.
पोतनीस, चं. रा.