कॉर्पस क्रिस्ती : अमेरिकेतील टेक्सस राज्याच्या न्युएसिस परगण्याचे मुख्य शहर. लोकसंख्या २,०४,५२५ (१९७०). हे त्याच नावाच्या उपसागरावर, सॅन अँटोनिओच्या आग्नेयीस सु. २०० किमी., न्यूएसिस नदीच्या मुखावर आहे. मेक्सिकोच्या आखाताला जोडणारा किनारी जलमार्ग येथून जात असल्याने, कॉर्पस क्रिस्ती हे महत्त्वाचे बंदर झाले आहे. येथे कापूस, मासळी, फळे, तेल, रसायने, सिमेंट, ॲल्युमिनियम, जस्तशुद्धी, वनस्पती तेलाच्या घाण्या, कापूस पिंजणे वगैरे अनेक उद्योग आहेत. कॉर्पस क्रिस्ती विश्वविद्यालय, डेल मार महाविद्यालय ही शिक्षणकेंद्रे आहेत. १९४१ साली येथे नाविक दलाचा हवाईदल स्थापण्यात आला. १९२३ ते १९३० च्या काळात ह्या भागात तेल व नैसर्गिक वायू आढळून आल्यामुळे उद्योगधंद्यांस चालना मिळाली. हे लोहमार्गाचेही केंद्र आहे.

लिमये, दि. ह.