कॉर्निश साहित्य : कॉर्निश ही कॉर्नवॉलमध्ये राहणाऱ्या लोकांची एके काळची भाषा. ही भाषा इंडो-यूरोपियनच्या केल्टिक समूहाच्या ब्रायथॉनिक शाखेची. तिचा शेवटचा भाषिक इ. स. १७७७ मध्ये मरण पावला. म्हणजे जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वी ती मृतभाषा बनली.

उपलब्ध कॉर्निश साहित्य फारसे नाही. अगदी आरंभीच्या कॉर्निश साहित्यात काही लॅटिन ग्रंथांवर स्पष्टीकरणवजा लिहिलेल्या टीपा, ॲल्फ्रिकच्या लॅटिन-अँग्लो-सॅक्सन शब्दसंग्रहावर आधारलेला बाराव्या शतकातील एक शब्दसंग्रह ह्यांचा समावेश होतो. सुमारे चौदाव्या शतकाच्या अखेरीस लिहिल्या गेलेल्या एका साहित्यकृतीच्या ४१ ओळी उपलब्ध आहेत. त्याचे एकंदर स्वरूप नाट्यात्म असून पतीशी कसे वागावे, ह्यासंबंधीचा एका मुलीला केलेला उपदेश त्यात आहे. Pascon Agan Arluth (पंधरावे शतक, इं. शी. द पॅशन ऑफ अवर लॉर्ड) हे २५९ कडव्यांचे कथाकाव्य उल्लेखनीय आहे. चार शुभवार्तांवर अनधिकृत सामग्रीचाही त्यासाठी उपयोग करून घेण्यात आलेला आहे. Ordinalia ही रहस्यनाटकांची (मिस्टरी प्लेज) एक त्रयी. Origo Mundi (२,८४६ ओळी), Passio Domini (३,२४२ ओळी) आणि Ressurectio Domini (२,६४६ ओळी) ही ह्या त्रयीतील तीन नाटके (त्यांचे इं. शी क्रिएशन, पॅशन आणि रेसरेक्शन). दोन हस्तलिखितांमध्ये ती उपलब्ध आहेत. त्यांतील एक हस्तलिखित सु. पंधराव्या शतकातील असून दुसरे सतराव्या शतकातील आहे. ह्या दुसऱ्या हस्तलिखिताबरोबर जॉन केगविन नावाच्या गृहस्थाने केलेले त्याचे इंग्रजी भाषांतरही आहे. ह्या नाटकांतील देखावे कसे मांडले जावेत, हे सुचविणारी आकृती ह्या दोन्ही हस्तलिखितांत आहे.

‘क्रिएशन’ मध्ये सॉलोमनचे मंदिर उभारले जाण्यापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांचा भाग येतो. ‘पॅशन’ मध्ये ख्रिस्ताच्या वधापर्यंतच्या घटना आहेत आणि ख्रिस्ताचे पुनरुत्थान ‘रेसरेक्शन’ मध्ये दाखविलले आहे. ह्या तिन्ही नाट्यकृती छंदोबद्ध असून काहीशा नीरसच आहेत.

Beunans Meriasek (इं. भा. लाइफ ऑफ मेरिआसेक, १८७२) ह्या एका संतचरित्रपर नाटकाची १७०४ मधील हस्तलिखित प्रतवेल्शच्या नॅशनल लायब्ररीत आहे. ह्या नाटकाच्या रचनेत विविध प्रकारचे छंद वापरले आहेत. Gwreans an Bys (इं. शी. द क्रिएशन ऑफ द वर्ल्ड- उपलब्ध हस्तलिखित सतराव्या शतकातले) हे नाटक Ordinalia त्रयीमधील ‘क्रिएशन’ ह्या पहिल्या नाटकाच्या पहिल्या अंकावरच आधारलेले आहे. यांखेरीज त्रुटित स्वरूपात आढळणारे काही कॉर्निश साहित्य आहे. तथापि ते विशेष उल्लेखनीय नाही.

कुलकर्णी, अ. र.