कवच विरूपण : पृथ्वीच्या कवचाच्या हालचालींमुळे कवचाच्या खडकांस बाक येणे किंवा घड्या पडणे किंवा त्यांच्यात विभंग (मोठ्या भेगा) उत्पन्न होणे याला कवच विरूपण म्हणतात. कवचाच्या हालचालींमुळे व त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या विरूपणांचे दोन प्रकार आहेत. (१) गिरीजनक (पर्वत निर्माण करणाऱ्या) हालचालींमुळे होणारे विरूपण : यात पृथ्वीच्या लांब व चिंचोळ्या प्रदेशावर संपीडक (संकोचन घडवून आणणारा) दाब पडून खडकांना घड्या पडणे व त्यांच्यात व्युत्क्रमी विभंग किंवा प्रणोद विभंग [→ विभंग, खडकांतील] उत्पन्न होणे इ. क्रिया घडून येतात. उदा., हिमालय किंवा अरवली यांच्या रांगा असलेला प्रदेश, हे गिरीजनक हालचालींमुळे निर्माण झालेले आहेत. (२) भूरूपजनक किंवा खंडजनक हालचालींमुळे होणारे विरूपण : यात कवचाच्या विस्तीर्ण क्षेत्रास किंचित बाक येतो व पालथ्या किंवा उलथ्या तव्यासारखे फुगवटे व खोलसर भाग तयार होतात. त्या क्षेत्रावर ताण पडून सामान्य विभंग तयार होतात. खडकांस घड्या पडून संमुखनती व विमुखनती [→ घड्या, खडकांतील] उत्पन्न झाल्या तर त्या रुंद व मंद तरंगांसारख्या असतात. उदा., भारताचे द्वीपकल्प आणि आफ्रिका खंडाचा बराचसा भाग ही भूरूपजनक हालचालींमुळे निर्माण झालेली आहेत.
केळकर, क.वा.