कॉफ्का, कुर्ट : (१८ मार्च १८८६–२२ नोव्हेंबर १९४१). प्रसिद्ध जर्मन-अमेरिकन मानसशास्त्रज्ञ व व्यूह मानसशास्त्राच्या तीन प्रणेत्यांपैकी एक. त्याचा जन्म बर्लिन येथे झाला. बर्लिन विद्यापीठातून १९०८ मध्ये पीएच्. डी. झाल्यावर वुर्ट्सबर्ग, फ्रँकफुर्ट आणि गीसेन विद्यापीठांत त्याने साहाय्यक म्हणून काम केले. १९११ ते १८ पर्यंत गीसेन विद्यापीठात तो मानसशास्त्राचा अधिव्याख्याता व १९१९ ते २७ पर्यंत तेथेच साहाय्यक प्राध्यापक होता. १९२७ मध्ये त्याने जर्मनी सोडली व तो अमेरिकेत स्थायिक झाला. तेथे कॉर्नेल, इथाका आणि विस्कॉन्सिन या विद्यापीठांत अध्यापन केल्यानंतर तो नॉर्दॅम्प्टन येथील स्मिथ कॉलेजात मानसशास्त्राचा प्राध्यापक झाला. तेथे तो शेवटपर्यंत होता.
त्याने ⇨ व्होल्फगांग कलर आणि ⇨ माक्स व्हेर्थायमर यांच्या सहकार्याने व्यूह मानसशास्त्राचा पाया घातला. मानसशास्त्रातील व्हूंट व टिचनरच्या मूलघटकवादाची प्रतिक्रिया म्हणून प्रस्तुत प्रणाली उदयास आली. तिच्यातील संवेदनासंबंधीचा व्यूहवादी दृष्टीकोन व विवेचन ही विशेष प्रसिद्ध आहेत. मानसशास्त्रातील सर्वच अभ्यासविषयांवर तिचा फार मोठा प्रभाव पडला आहे. वर्तनवादासही या प्रणालीने विरोध केला. कॉफ्काचा Die Grundlagen der Psychischen Entwicklung Eine Einfuhrung in die Kinderpsycholgie (१९२१) हा पहिला ग्रंथ असून त्याचेच पुढे १९२४ मध्ये इंग्रजीत द ग्रोथ ऑफ द माइंड ह्या नावाने भाषांतर झाले. प्रस्तुत ग्रंथात त्याने व्यूह मानसशास्त्राच्या सिद्धांतांचा ⇨ बालमानसशास्त्रात उपयोग केला. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच ग्रंथाची पुढे स्पॅनिश, रशियन, चिनी, जपानी इ. भाषांतही भाषांतरे झालेली आहेत. त्याचा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ प्रिन्सिपल्स ऑफ गेश्टाल्ट सायकॉलॉजी (१९३५) हा असून, त्यात त्याने मानसशास्त्रातील विविध प्रश्नांचा विस्तृत आढावा घेतला आहे व व्यूह प्रणालीचे सैद्धांतिक विवरणही केले आहे. व्यूह मानसशास्त्रातील कॉफ्काचे नेमके कर्तृत्व कोणते हे सांगणे कठीण आहे; कारण त्या प्रणालीच्या तिघाही प्रणेत्यांचा पसस्परांवर अतिशय प्रभाव पडलेला असून ती प्रणाली तिघांच्याही विचारांचा परिपाक आहे. तथापि वैज्ञानिक प्रगतीची गंभीरपणे दखल घेऊनही ‘अर्थपूर्णता’ आणि ‘मूल्य’ ह्या संकल्पनांना योग्य ते स्थान दिले पाहिजे, हा कॉफ्काचा एक महत्त्वपूर्ण दृष्टिकोन उल्लेखनीय आहे. त्याच्या मते अर्थ आणि मूल्य या संकल्पनांची उपेक्षा केली, तर वैज्ञानिक संशोधनास त्यामुळेच बाध येतो.
तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास त्याने आपल्या दुसऱ्या ग्रंथात ‘भौगोलिक परिसर’ आणि ‘वर्तन परिसर’ असा जो भेद केला आहे, तो विशेष महत्त्वाचा आहे. तसेच ‘अहं’ या संकल्पनेचेही त्याने पुनःस्थापन केले. कॉफ्काने आपल्या ग्रंथात उपस्थित केलेल्या अनेक समस्या आजही तत्त्वज्ञानात महत्त्वाच्या मानल्या जातात. मानसशास्त्रज्ञ म्हणून त्याचे स्थान त्याच्या समकालीनांत श्रेष्ठ मानले जाते. मानसशास्त्रातील अनेक विषयांवर त्याने विविध नियतकालिकांतून दर्जेदार निबंधही लिहिलेले आहेत. अमेरिकेतील नॉर्दॅम्प्टन येथे तो निधन पावला.
पहा : व्यूह मानसशास्त्र.
सुर्वे, भा. ग.