कॉमिनफॉर्म : रशियाच्या नेतृत्वाखाली १९४७ मध्ये विल्चा गोरा (पोलंड) येथे स्थापन झालेली कम्युनिस्ट पक्षांची संघटना. या संघटनेत रशिया, पूर्व यूरोपातील रशियाची अंकित राष्ट्रे, फ्रान्स व इटली या देशांतील कम्युनिस्ट पक्ष सामील झाले होते. एका अर्थाने ही संघटना कॉमिन्टर्नचाच वारसा घेऊन जन्माला आली होती. परंतु तिचे क्षेत्र व शक्ती कॉमिन्टर्नपेक्षा फारच कमी होती. दुसऱ्या महायुद्धानंतर यूरोपमध्ये निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीत रशियाच्या प्रभावाचे क्षेत्र वाढविणे, हा एक महत्त्वाचा उद्देश या संघटनेमागे होता. म्हणूनच ही संघटना म्हणजे रशियाचे अधिकृत आंतरराष्ट्रीय नियंत्रण केंद्र मानली जात होती. या संघटनेच्या साहाय्यानेच रशियाने चेकोस्लाव्हाकिया, पोलंड, हंगेरी आणि इतर पूर्व युरोपीय देशांत अल्पसंख्य कम्युनिस्ट पक्षांना सत्तेवर बसविले व पूर्व युरोप हा आपल्याच सोव्हिएट राज्यपद्धतीचा भाग आहे असे प्रतिपादन केले.

 

पण यूगोस्लाव्हियातील कम्युनिस्ट पक्षाला रशियाचा हस्तक्षेप जाचक वाटला व तो देश कॉमिनफॉर्ममधून जून १९४८ मध्ये बाहेर पडला. स्टालिनच्या मृत्यूनंतर ख्रुश्चेव्हने १९५६ साली ही संघटना विसर्जित केली.

 

गर्गे, स. मा.