कॉन्स्टंटीन : प्राचीन सिर्तो. अल्जीरियाच्या त्याच नावाच्या प्रांताची राजधानी. लोकसंख्या २,५५,००० (१९६७). हे अल्जिअर्सच्या आग्नेयीस ३२० किमी., ऱ्यूमेल नदीकाठी उंच खडकाळ दरडीवर, समुद्रसपाटीपासून ६५६ मी. उंचीवर वसले आहे. अल्जीरियाच्या पठारी आणि रुक्ष अंतर्भागातील उत्पादनांची ही प्रमुख बाजारपेठ आहे. नदीच्या सु. ८० मी. उंचीच्या धबधब्याजवळ एक जलविद्युत् प्रकल्प उभारण्यात आला आहे. येथे कृषि-अवजारे, सिमेंट, तंबाखूच्या वस्तू, कंतानाच्या पिशव्या वगैरे उद्योग महत्त्वाचे आहेत. पिठाच्या गिरण्या, धान्यबाजार, कापड, कातडी वस्तू, लोकर, एस्पार्टो गवत, ऑलिव्ह तेल यांचाही व्यापार होतो. ६४ किमी. वर स्किकिडा हे बंदर आहे आणि १२ किमी. वर विमानतळ आहे. येथे रोमन तटबंदीचे अवशेष आहेत. न्युमिडियन, रोमन, मुस्लिम, तुर्की, फ्रेंच सत्तांतरानंतर आता हे अल्जीरियातील ५० टक्क्यांहून अधिक मुस्लीम वस्तीचे मोठे शहर आहे. ३११ च्या यादवी युद्धानंतर पहिला कॉन्स्टंटीन याने ते पुन्हा वसविले.

 

लिमये, दि. ह.