कॉड : अस्थिमत्स्यांच्या (शरीरात हाडांचा सांगाडा असणाऱ्या माशांच्या) गॅडिडी कुलातील गॅडस वंशाचा हा एक महत्त्वाचा सागरी मासा आहे. उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर पॅसिफिक महासागर आणि बाल्टिक समुद्रात तो आढळतो. दक्षिण गोलार्ध आणि उष्णकटिबंधात तुलनेने ते फारच थोडे आहेत. ५५–४६० मी. इतक्या खोल पाण्यात ते साधारणतः असतात, पण क्वचित समुद्राच्या पृष्ठभागावरही आढळतात. अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेले) प्राणी व लहान मासे हे त्यांचे भक्ष्य होय. कॉड मासा इतका अधाशी असतो की, मिळतील त्या वस्तूंचा तो फडशा पाडतो. विच्छेदन केले असता त्याच्या पोटात रबराचे व कातड्याचे तुकडे, दगड, गोटे, काचा इ. वस्तू सापडतात. खुद्द कॉड मासे शार्क माशांचे भक्ष्य होत. हंगामानुसार कॉड स्थलांतर करतात. उन्हाळ्यात उत्तरेकडे उथळ पाण्यात तर हिवाळ्यात दक्षिणेकडील खोल पाण्यात ते जातात.
सामान्य कॉड माशाचे शास्त्रीय नाव गॅडस मोऱ्हुआ आहे. त्याची लांबी ७ सेंमी. पासून १८५ सेंमी. पर्यंत असते वजन ३–१८ किग्रॅ. असते, पण यापेक्षाही जास्त वजनाचे कॉड आढळल्याची नोंद आहे. याचे डोके मोठे असून शरीर शेपटीकडे निमुळते होत गेलेले असते तोंड व डोळे मोठे असतात वरचा जबडा खालच्यापेक्षा थोडा पुढे आलेला असतो हनुवटीवर एक स्पृशा (संवेदी उपांग) असते पार्श्वरेखा (बाजूवरील रेषा) फिक्कट असते पृष्ठपक्ष (पाठीवरील पर म्हणजे हालचालीस अथवा तोल सांभाळण्यास उपयुक्त असणाऱ्या त्वचेच्या स्नानुमय घड्या) तीन व गुदपक्ष दोन असतात शरीरावरील खवले लहान आणि चक्राभ असतात. कॉड मासे करड्या, हिरव्या, तपकिरी, तांबड्या अशा विविध रंगांचे असतात.
यूरोपीय कॉडची मादी उत्तर किनाऱ्याजवळ फेब्रुवारी ते एप्रिल या महिन्यांत आणि अमेरिकी कॉडची मादी ऑक्टोबर ते जूनच्या दरम्यान अंडी घालते. एक मादी वर्षात सरासरी ९० लक्ष अंडी घालते. अंडी लहान व पाण्यावर तरंगणारी असतात. १०–१५ दिवसांत अंड्यातून पिल्ले बाहेर पडून पोहू लागतात काही आठवड्यांनी ती खोल पाण्यात जातात. सुरुवातीला काही सेंमी. लांब असलेली ही पिल्ले वाढत जाऊन तिसऱ्या वर्षी ५०–९० सेंमी. लांब होतात.
भारतात एका जातीचा कॉड मासा आढळतो. याचे शास्त्रीय नाव ब्रेग्मॅसेरॉस मॅक्क्लेलँडाय असे आहे. याची लांबी ७–८ सेंमी. असून पाठ हिरवट रुपेरी रंगाची असते. डोक्याचा वरचा भाग काळा असतो. पश्चिम किनाऱ्यावर रत्नागिरीपासून भडोचपर्यंत या जातीचे कित्येक हजार टन मासे दरवर्षी पकडले जातात.
कॉड मासा खाद्य आहे. खाण्याशिवाय त्याचे इतरही बरेच उपयोग आहेत. याच्या ताज्या यकृतापासून औषधी तेल काढतात. ते ‘कॉडलिव्हर ऑईल’ या नावाने प्रसिद्ध असून त्यात अ आणि ड ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. याच्या त्वचेपासून उत्तम सरस तयार करतात. याच्या वाताशयापासून जिलेटीन असलेला ‘आयसिंग्लास’ हा पदार्थ तयार करण्यात येतो. त्याचा उपयोग मद्य स्वच्छ करण्याकरिता करतात. कॉड माशांचे विविध उपयोग असल्यामुळे दरवर्षी लाखो टन कॉड मासे पकडले जाऊन ते ताजे, गोठवून किंवा खारवून व वाळवून वापरले जातात.
परांजपे, स. य. कुलकर्णी, स. वि.
“